एकाचा मृत्यू; पाच जण गंभीर जखमी
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात एक दुर्घटना घडली आहे. एका पुनर्विकासाधीन इमारतीचे काम सुरू असताना सहाव्या मजल्यावरून सहा कामगार खाली कोसळले. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाषनगरमधील इमारत क्रमांक 36 च्या पुनर्विकासाचे काम सुरू होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर विटांचं काम करत असताना अचानक सहा कामगार खाली कोसळले. मात्र, या कामगारांनी काम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी किट किंवा सुरक्षा साधनांचा वापर केला नव्हता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे यातील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 5 जणांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रामल्लू (55) असे मृत कामगारांचे नाव असून गुणधर राय (22), उसराय (30), रमेश राय (25), विजय (25) आणि संदीप (27) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. या घटनेचा अधिक तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.







