कार्यकर्त्यांनो, कामाला लागा

ॲड. आस्वाद पाटील यांचे आवाहन; खोपोलीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक

| खोपोली | प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्हीही मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बूथ कमिटी, प्रत्येक बूथवर पक्षाची मते किती, विरोधी पक्षाची किती आहेत, याचा सर्व्हे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागून 20 दिवसांत जिल्ह्याकडे माहिती पोहोचवा, असे आवाहन जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिले. ते खोपोलीतील बैठकीत बोलत होते.

खालापूर आणि कर्जत तालुक्यातील शेकापक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खोपोलीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, आरडीसी बँकेचे उपाध्यक्ष आणि शेकाप नेते सुरेश खैरे, प्रदीप नाईक, गौतम पाटील, परेश देशमुख यांच्यासह खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, खोपोली शहर चिटणीस अविनाश तावडे, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम, कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, दिलीप पोरवाल, शांताराम पाटील, शिवानी जंगम, दिनेश गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांनी बूथ कमिटी तयार करण्यासंबंधीची माहिती देत बूथवर प्रत्यक्ष असलेल्या शेकापक्षाचे मतदान आणि विरोधी पक्षाच्या मतदानाची संख्या त्याची प्रत्यक्ष माहिती कार्यकर्त्यांनी गावागावात घ्यावी. रायगड जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघ दोन असले तरी जिल्ह्यात एकूण किती मतदान आहे, याचा सर्व्हे सुरू असून, इंडिया आघाडीत जिल्हा सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप काम करीत आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून भविष्यात शेकाप निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती शेकाप नेते सुरेश खैरे यांनी दिली.

रसायनीचे राकेश खारकर आणि आत्करगाव येथील संतोष पाटील यांना खालापूर तालुका सहसचिव म्हणून नियुक्तीपत्र जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.

Exit mobile version