वाघोशी विद्यालयात कार्यशाळा

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
दिवाळी निमित्त सुधागड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वाघोशी येथे नुकतेच पर्यावरणस्नेही आकाश कंदील बनविणे कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आकर्षक आकाश कंदील बनविले आणि पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला.
या कार्यशाळेत इयत्ता 8 वी व 9 वीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. बनविलेले काही आकाश कंदील शाळेत ठेवण्यात आले तर काही आकाश कंदील विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नेले. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेश गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश शेडगे, सुजाता गोळे, विकास निकम, संतोष गायकवाड, मयुर देशमुख, सुधीर देशमुख, शिरीष मोरे यांनी मेहनत घेतली. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. वाघोशी विद्यालयात नेहमी नवोपक्रम राबविले जातात.

Exit mobile version