किहीम पक्षीसंवर्धनासाठी कार्यशाळा

| अलिबाग | प्रतिनिधी |

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (दि. 5 नोव्हेंबर) आणि पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सालिम अली (दि. 12 नोव्हेंबर) यांच्या जन्मदिनाच्या मधल्या काळात राज्यभरात पक्षी सप्ताह महाराष्ट्रात राबवण्यात येतो. पक्षीसंवर्धन आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. बॉम्बे नॅचुरल हिस्ट्री सोसाईटी, मुंबई यांच्या पुढाकाराने अलिबाग तालुक्यातील किहीम येथे नुकतेच कार्यालय सुरू करण्यात आले असून, याठिकाणी पक्षीसप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, जगविख्यात पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सालिम अली यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम हात घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणि पक्षीसप्ताहानिमित्त ‌‘किहीम पर्यटन गाव-पक्षीओळख आणि पक्षीशास्त्र’ या विषयावर आधारित दि. 8 व 9 नोव्हेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही कार्यशाळा बॉम्बे नॅचुरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ उच्च महाविद्यालय, चोंढी-किहीम येथे भरवण्यात आली होती. दरम्यान, बॉम्बे नॅचुरल हिस्ट्री सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे व प्रकल्प सहायक रोहन चव्हाण यांनी किहीम व त्यालगतच्या गावांमधील 20 पेक्षा अधिक स्थानिक युवकांना, वनविभागातील कर्मचारी व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पक्षीओळख व पक्षीशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला प्राचार्य लीना पाटील व पक्षीमित्र प्रदीप कवळे उपस्थित होते.

Exit mobile version