निविष्ठा विक्रेते, गुणनियंत्रण निरीक्षकांची कार्यशाळा संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

खरीप हंगाम 2024 पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेते, कंपनी प्रतिनिधी व गुणनियंत्रक निरिक्षक यांची कार्यशाळा प्रशिक्षण (दि.16) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड यांच्या अध्यक्षतेखाली व कृषि विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांनी विक्री केंद्रावर अद्ययावत परवाना, निविष्ठांचे दरपत्रक व टोल फ्री क्रमांक दर्शनीभागात लावण्यात यावा तसेच निविष्ठांची विक्री करताना शेतकर्‍यांना विहीत नमुन्यात पावती देण्यात यावी याबाबत सूचना दिल्या. शेतकर्‍यांना अनुदानीत रासायनिक खतांची विक्री करताना पॉस मशिनव्दारेच विक्री करावी. बियाणे खते व किटकनाशके योग्य गुणवत्तेची व मागणीप्रमाणे वेळेत पुरवठा करण्याबाबत संबंधित उत्पादक कंपन्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच युरिया ब्रिकेट, नॅनो युरिया, नॅनो डिएपी खतांचा वापर वाढविण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करुन प्रसिध्दी देणेत यावी. किटकनाशके फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर करणे बाबत शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे.

जिल्हयात तालुक्यात भरारी पथकांची स्थापना केली असून या पथकामार्फत तपासणी करुन विक्रेत्यांकडील अनियमितेबाबत उदा. निविष्ठांची शेतकर्‍यांना पक्की पावती न देणे, जादा दराने विक्री करणे, रेकॉर्ड अद्ययावत नसणे, योग्य गुणवत्तेच्या निविष्ठा विक्रीस न ठेवणे इत्यादी कारणामुळे संबंधित विक्रेत्याचा परवाना रद्द करुन कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकर्‍यांना चांगल्या प्रतिचे व योग्य गुणवत्तेचे योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देवून हा खरीप हंगाम यशस्वी करण्याबाबत निविष्ठा उत्पादक कंपनी व विक्रेत्यांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी आवाहन केले. सर्व प्रथम कृषि विकास अधिकारी मिलिंद चौधरी यांनी उपस्थित सर्वाचे स्वागत करून सभा व प्रशिक्षणाचा उददेश या बाबत सविस्तर प्रस्तावित केले. शेवटी कृषि अधिकारी महामुणी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले

Exit mobile version