विश्व बॅडमिंटन स्पर्धा; प्रणॉयचे पदक निश्चित

| कोपेनहेगन | वृत्तसंस्था |

भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दोनवेळच्या माजी विजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनचा पराभव करत पदक निश्चित केले. 68 मिनिटे चाललेल्या उपउपांत्यफेरीमध्ये प्रणॉयने पदक निश्चित केले. प्रणॉय आता उपांत्यफेरीत फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत तिसरे मानांकन असलेल्या कुनलावूत विट्रीडसॅरनशी भिडणार आहे. हा सामना रविवारी होणार आहे. प्रणॉयन उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कमालीचा संयम बाळगताना ॲक्सेलसेनचे आव्हान 1 तास 8 मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणले. व्हिक्टरने पहिल्या गेमला निर्विवाद वर्चस्व राखताना 2-2 अशा बरोबरीनंतर 9-2 अशी आघाडी 16-13 अशी वाढवली. या स्थितित सलग पाच गुण मिळवत ॲक्सेलसेनने पहिला डाव जिंकला.

दुसऱ्या डावात चुरस सुरुवातीपासून दिसून आली. रॅलीजच्या बहारदार खेळाने ही जोडी 8-8 अशी बरोबरीत होती. तेव्हा प्रणॉयने सलग पाच गुणांची कमाई करताना 13-10 अशी आघाडी घेतली आणि ती 17-10 अशी वाढवत दुसरा डावही सहज जिंकला. तिसऱ्या निर्णायक डावात आणखी चुरस अपेक्षित होती. पण, प्रणॉयने 4-4 अशा बरोबरीनंतर 7-6 अशी आघाडी सलग पाच गुण मिळवत 12-6 अशी वाढवली आणि कधीच मागे वळून बघितले नाही. प्रणॉयने 20-15 अशा आघाडीवर मिळविलेल्या सहा मॅचपॉइंटपैकी एक गमावला. मात्र, पुढच्याच गुणाला प्रणॉयने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, दुहेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीची जागतिक स्पर्धेतील वाटलाच उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली. डेन्मार्कच्या किम अस्ट्रप-आंद्रेस स्कार्प रॅस्मुसेन जोडीने भारतीय जोडीचा 21-18, 21-19 असा पराभव केला. डेन्मार्क जोडीला 11वे मानांकन होते. ही लढत 48 मिनिटे चालली. डेन्मार्कच्या जोडीसमोर भारतीय जोडी आपली आक्रमकता दाखवू शकली नाही. भारतीय जोडीने गेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. केरळच्या 31 वर्षाच्या प्रणॉयने या वर्षी मलेशिया मास्टर्स सुपर 500 आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 ची फायनल गाठली होती. त्याने आपली दमदार कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवत भारताचे 14 वे पदक निश्चित केले.

भारताने आतापर्यंत विश्व बॅडमिंटन अजिंक्यपदमध्ये 14 पदके जिंकली आहेत. त्यातील 5 पदके ही एकट्या पी. व्ही. सिंधूने जिंकली आहेत. यात 2019 मधील सुवर्ण पदकाचा देखील समावेश आहे.

Exit mobile version