भारताचा विश्‍वविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का

। लंडन । वृत्तसंस्था ।

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारतीय संघाने प्रो हॉकी लीगच्या लंडन टप्प्यात विश्‍वविजेत्या जर्मनीचा धक्कादायक पराभव केला. स्वतः ड्रॅग फ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने 16व्या, सुखजीत सिंगने 41व्या तर गुरजंत सिंगने 44व्या मिनिटाला गोल केले. जर्मनीने या सामन्यात प्रामुख्याने नवोदितांना संधी दिली; पण त्यांनीही जोरदार आक्रमणाने सुरुवात केली होती; मात्र भारतीयांच्या नियोजित खेळासमोर त्यांची मात्र चालली नाही.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचे या प्रो हॉकीत 13 सामन्यांतून 24 गुण झाले असून ते तिसर्‍या स्थानावर आहेत. अँटवर्प टप्प्यात भारताचा दोनदा पराभव करणारे अर्जेंटिना 14 सामन्यांत 26 गुणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहेत. तर, 12 सामन्यांतून 26 गुणांची कमाई करणारे नेदरलँड्स पहिल्या क्रमांकावर आहेत. जर्मनीच्या संघाने पहिल्या सत्रात बेधडक खेळ केला; परंतु, त्यांची आक्रमणे भारताचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेशनने यशस्वीपणे थोपविली. भारतालाही पहिल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आले नाहीत; परंतु, दुसर्‍या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यानंतर सुखजीतने 41व्या मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट केली. अभिषेकच्या पासवर त्याने जर्मन गोलरक्षकाला पुरते चकविले. तीन मिनिटांनंतर गुरजंतने भारताचा तिसरा गोल केला. 0-3 अशा पिछाडीनंतर जर्मनीच्या खेळाडूंनी आपले आक्रमण अधिक धारदार केले, भारतीय गोलक्षेत्रात त्यांनी प्रवेशही केला; परंतु, त्यांना पुन्हा एकदा श्रीजेशची भिंत भेदता आली नाही. भारताचा जर्मनीविरुद्धचा पुढचा सामना 8 जून रोजी होणार आहे, तर ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या लढती 2 आणि 9 जून रोजी आहेत.

Exit mobile version