समुद्र जपुया, निसर्ग वाचवुया!
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड वसंतराव नाईक कला आणि वाणिज्य महाविद्यालया मधील राष्ट्रीय सेवा योजना युनिट 10 आणि जीवन दीर्घ शिक्षण आणि विस्तार विभाग, राष्ट्रीय किनारा संशोधन केंद्र व मुरुड-जंजिरा नगरपालिका परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ या जागतिक किनारपट्टी स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, शेकडो हातांनी समुद्रकिनारा स्वच्छ केला.
यावेळी तहसीलदार आदेश डफळ, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, डॉ. सुभाष म्हात्रे, वसंतराव नाईक महाविद्यालयात विकास समिती सदस्य डॉ. विश्वास चव्हाण, मुरूड वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, एनएसएस प्रमुख डॉ. श्रीशैल बहिरगुडे, गजानन मुनेश्वर, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर बैले, नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, मुरूड बंदर निरीक्षक प्रमोद राऊळ, डॉ. नारायण बागुल, डॉ. सीमा नाहिद, राकेश पाटील, सतेज निमकर, सिटी को. ऑडिनेटर सचिन कोरके, सागर कन्या मच्छिमार सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन मनोहर मकु, विजय सुर्वे आदींसह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुभाष म्हात्रे यांनी शपथीचे वाचन करून विद्यार्थी व मान्यवरांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रा. डॉ. जनार्दन कांबळे म्हणाले की, नॅशनल सेंटर कोस्टल रीसर्च चेन्नई यांनी मुरूड वसंतराव नाईक महाविद्यालयाला समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी संधी दिली आहे. महाविद्यालयातील एन.एस.एस.युनिट दहा गेली 32 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. स्वच्छता ही राष्ट्र सेवा आहे. शहरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रत्येकांनी प्रयत्न केले पाहिजे.
डॉ. विश्वास चव्हाण म्हणाले की, सागरी स्वच्छता महाविद्यालयाच्या माध्यमातून दरवेळी किनारा स्वच्छ केला जातो. आताच्या विद्यार्थ्यांना चांगले संस्कार असल्याने कचरा कुठेही दिसला की तो कचरा डस्टबिनमध्ये टाकला जातो. त्यामुळे मुरूड स्वच्छ सुंदर असून, किनाराही स्वच्छ राहील यांची काळजी घेतली पाहिजे.
मनोहर बैले म्हणाले की, समुद्र हा केवळ पाण्याचा अथांग साठा नाही तर तो आपला जीवनदाता आहे. अन्न देणारा, श्वास शुद्ध करणारा आणि निसर्गाचे सौंदर्य जपणारा सागरी स्वच्छता दिनानिमित्त सहभागी होताना निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ झाल्याची जाणीव झाली.
कचरा उघड्यावर व गटारात न टाकता नगरपरिषदेच्या कचरा गाडीमध्ये टाकावा. हे प्रत्येकांनी केलं तर कुठलीच रोगराई पसरणार नाही आणि आपले शहर स्वच्छ व सुंदर दिसेल. आपला परिसर पर्यटनस्थळ असून, शेकडो पर्यटक समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात. स्वच्छता पाहून पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन रोजगारही वाढेल. तरी, स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता स्वच्छता अंमलात आणा, असे आवाहन डॉ. श्रीशैल बहिरगुडे यांनी केले. या स्वच्छता मोहिमेत दोन टनापेक्षा अधिक कचरा गोळा करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेच्यावतीने साफसफाई करणाऱ्यांना तोंडाला मास्क व हँडगोल्ज देण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुभाष म्हात्रे व आभार प्रदर्शन डॉ. नारायण बागुल यांनी केले.






