विश्‍वकरंडक कंपाऊंड तिरंदाजी

भारतीय महिला अंतिम फेरीत

। येचॉन । वृत्तसंस्था ।

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघ विश्‍वकरंडक स्पर्धेत आपली सुवर्ण मालिका कायम ठेवण्याच्या मार्गावर आहे. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा पुरुष कंपाऊंड संघही जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे; परंतु त्यांना अपेक्षा पूर्ण करण्यात पुन्हा अपयश आले. त्यांना ब्राँझपदकही मिळवता आले नाही.

ज्योती सुरेखा, परनीत कुमार आणि आदिती स्वामी या महिला संघाने शांघाय येथे गेल्या महिन्यात झालेल्या विश्‍वकरंडकाच्या पहिल्या टप्प्यात सुवर्णपदक जिंकले आहे. आज उपांत्य लढतीत त्यांनी जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा 233-229 असा पराभव केला. विजेतेपदासाठी त्यांचा सामना तुर्की संघाविरुद्ध होणार आहे. तुर्कीचा संघ जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या उपांत्य सामन्यात तुर्कीने दक्षिण कोरियावर 234-233 अशी मात केली. भारतीय महिला संघासाठी अंतिम फेरीपर्यंतचा हा प्रवास सोपा राहिला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पुढे चाल मिळाली. त्यानंतर या फेरीत त्यांनी इटली संघावर 236-234 अशी सहज मात केली.

पुरुष संघाकडून निराशाप्रियांश, प्रथमेश आणि अनुभवी अभिषेक वर्मा हा भारताचा पुरुष संघ पात्रता फेरीत चौथ्या स्थानापर्यंत घसरला होता. आज त्यांच्यापेक्षा कमी मानांकन असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून 133-133 (10-10*) अशा पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रमवारीत 21व्या स्थानावर आहे.भारतीय पुरुष संघाने व्हिएतनामचा 235-212 असा पराभव करून शानदार सुरुवात केली होती; परंतु त्यांना सातत्य राखता आले नाही.

Exit mobile version