। मुंबई । वृत्तसंस्था ।
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानावर असलेली दीपिका कुमारी आशिया स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरली. आत्तापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा धक्का आहे.
येथील क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात सुरू असलेल्या चाचणी स्पर्धेत दीपिका तीन साखळी सामन्यांत पराभूत झाली, त्यामुळे आशियाई स्पर्धेसाठी तिला पात्रता मिळवता आली नाही. शनिवारी झालेल्या दोन टप्प्यांतील एलिमिनेशन स्पर्धेत दीपिका पाचव्या स्थानापर्यंत घसरली होती.
नवी दिल्लीत 2010 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर दीपिका प्रथमच बहुराष्ट्रीय स्पर्धेसाठी अपात्र ठरली आहे. तिने आत्तापर्यंत 2010, 2014 आणि 2018 च्या आशिया स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. गुवान्झोऊ येथे 12 वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ब्राँझ पदक जिंकले होते. 2009 पासून सीनियर गटातून खेळणार्या दीपिकाने आत्तापर्यंत अनेक जागतिक स्पर्धांत पदकांची लयलूट केली आहे, मात्र ऑलिंपिक पदक दूर राहिले आहे. विश्वकरंडक स्पर्धांत तिने एकूण 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि सात ब्राँझपदके जिंकली आहेत.
जागतिक क्रमवारीत दोनदा अव्वल टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ती अव्वल मानांकित खेळाडू म्हणून खेळली होती. लंडन ऑलिंपिकमध्येही हाच सन्मान तिला मिळाला होता. सलग पाच विश्वकरंडक स्पर्धेत पदके मिळवल्यामुळे ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आली होती.