जागतिक होमिओपॅथी दिन साजरा

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत मेडिकल असोसिएशनतर्फे जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कर्जत येथील रॉयल गार्डन रेस्टॉरंटमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी, कर्जत मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. प्रशांत गांगल, सुकाणू समितीचे सदस्य डॉ. प्रभाकर काळे यांच्यासह कर्जत मेडिकल असोसिएशन चे संपादक डॉ. कुमार ओसवाल, डॉ नितीन भोपतराव, डॉ. विलास सारोदे, सचिव डॉ. संजीव पाटील, डॉ. गीता राव, डॉ. शर्वाणी कुलकर्णी, डॉ. राहुल पाटील, कर्जत मेडिकल असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ. रितेश जैन, तसेच डॉ. मनीष परमार, उप खजिनदार डॉ. गणेश मेंगाळ आणि इतर वरिष्ठ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. आशुतोष कुलकर्णी यांनी सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करून विविध वैद्यकीय पद्धतीतील सर्वोत्तम उपचारांचा वापर करत रुग्णसेवा अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले. तर डॉ. नितीन भोपतराव यांनी मानसिक स्थिती आणि आजार यांच्या परस्पर संबंधांचं निरीक्षण होमिओपॅथीमधे किती उपयुक्त आहे, हे सोदाहरण स्पष्ट केले.

डॉ. प्रभाकर काळे यांनी आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्यातील परस्पर संबंध अधोरेखित करत, या दोन्ही पद्धतींची तत्त्वे आणि समग्र आरोग्यसेवेत त्यांची पूरक भूमिका स्पष्ट केली. डॉ. अमृता पाटील यांनी तीव्र आजारांच्या उपचारामध्ये होमिओपॅथीचे महत्त्व सांगितले आणि दैनंदिन वैद्यकीय व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या काही होमिओपॅथिक औषधांची उदाहरणे दिली. यावेळी डॉ. गीता राव यांनी कर्जत मेडिकल असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशनतर्फे होमिओपॅथी दिन साजरा केल्याबद्दल कर्जत मेडिकल असोसिएशनमधील सर्व होमिओपॅथ डॉक्टरांच्या वतीने आभार व्यक्त केले.

Exit mobile version