दिव्या देशमुख चॅम्पियन
| गांधीनगर | वृत्तसंस्था |
बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने येथे गुरुवारी संपलेल्या मुलींच्या विश्व ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. अखेरच्या फेरीत दिव्याने बल्गेरियाची बेलोस्लावा क्रस्टेवाचा पराभव केला.
27 देशांतील 101 खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. दिव्याने 11 फेऱ्यांमधून सर्वाधिक दहा गुणांची कमाई केली. फिडे रेटिंगनुसार दिव्या आणि क्रस्टेवा यांचा 20 वर्षांखालील ज्युनिअर क्रमवारीत अव्वल तीन खेळाडूंमध्ये समावेश आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या दिव्याला आता अव्वल स्थानावर झेप घेण्याची संधी असेल. 18 वर्षांच्या दिव्याने आपली सहकारी साची जैन हिच्यावर मात करत गुणसंख्या नऊ केली. त्यानंतर अर्मेनियाची मरियम मकर्चयन हिच्याविरुद्ध अर्ध्या गुणाची आघाडी घेतली. त्याआधी खुल्या तसेच मुलींच्या गटात साडेपाच गुणांसह प्रबळ दावेदार म्हणून वाटचाल करणाऱ्या नागपूरच्या या खेळाडूने अखेरच्या पाच फेऱ्यांमध्ये एकमेव आघाडी कायम राखली होती. या यशासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिव्याचे कौतुक केले आहे. 9 डिसेंबर 2005 ला नागपुरात जन्मलेली दिव्या आंतरराष्ट्रीय मास्टर असून 2022 ला महिला बुद्धिबळ चॅम्पियन, 2023 ला आशियाई महिला चॅम्पियन बनली होती.
अपेक्षांचे ओझे असल्याने दबावाचा सामना कसा करायचा, याचे कसब मी आत्मसात केले होते. मला माझ्या स्वत:कडूनदेखील खूप अपेक्षा होत्या; पण मी चित्त विचलित होऊ दिले नाही. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे, हे मी ठरवले होते.
दिव्या देशमुख