तलावातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमता वाढली
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सराई येथील तलावात गाळ साचल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे गावामध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चाने पोकलेन पाठवून तलावातील गाळ काढला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सराई गावालगतच तलाव आहे. या तलावातून पाण्याचा वापर येथील नागरिक मोठ्या प्रमाणात करीत आहेत. मात्र, तलावामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचला. त्याचा परिणाम पाण्याची टंचाई निर्माण झाली. तलावामध्ये पाणी नसल्याने महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. ही बाब परिसरातील शेकाप युवा नेतृत्व अमित फुंडे यांनी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने दखल घेत स्वखर्चाने पोकलेन पाठवून गाळ काढून घेतला. अमित फुंडे आणि दिलीप शेळके यांनी डंपरची व्यवस्था केली. चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने गावातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांसह महिलावर्गाने समाधान व्यक्त केले.