जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धा; हम्पीचे उपविजेतेपदावर समाधान


| मुंबई | वृत्तसंस्था |

भारताच्या कोनेरु हम्पीला जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याची संधी होती. तिने टायब्रेकर लढतीतील पहिला डाव जिंकलाही होता. पण तिला हा जोश राखता आला नाही आणि तिला महिलांच्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दरम्यान, पुरुषांच्या स्पर्धेत विदीत गुजराती चौथा आला.जागतिक जलद स्पर्धेतील हम्पीचे हे तिसरे पदक आहे. ती 2019 च्या स्पर्धेत विजेती होती, तर 2012 च्या स्पर्धेत तिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले होते. तिने अखेरच्या अकराव्या फेरीत कॅतेर्याना लाग्नो हिला पराभूत करून अव्वल स्पर्धकांत स्थान मिळवले. तिने ॲनास्तासिया बोदनारुकसह अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीच्या दोन डावांतील पहिला डाव हम्पीने काळी मोहरे असताना जिंकला, पण तिला दुसऱ्या डावात पांढरी मोहरे असताना हार पत्करावी लागली. बरोबरीची कोंडी सोडवण्यासाठी ब्लिट्झचे दोन डाव झाले. त्यातील पहिल्या डावात काळी मोहरे असताना हम्पीला विजयाची संधी होती; पण तिला त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही. याच वेळी तिने दुसरा डाव पांढरी मोहरे असताना गमावला आणि तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

विदीतला पुरुषांच्या स्पर्धेत पदक जिंकण्याची संधी होती. त्याने दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र त्याला अखेरच्या फेऱ्यांत अपेक्षित यश मिळवता आले नाही. या स्पर्धेतील तेरा फेऱ्यानंतर मॅग्नस कार्लसनने 10 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला, तर व्लादिमीर फेदोसीव 9.5 गुणांसह दुसरा आला. चीनचा यु यांगयी, विदीत, प्रज्ञानंद यांच्यासह एकूण 12 खेळाडूंचे नऊ गुण होते. त्यात टायब्रेकरवर यांगयी याला तिसरा क्रमांक देण्यात आला. विदीत चौथा आला, तर प्रज्ञानंदला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताला हम्पी आणि विदीत यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. हम्पीने चांगला खेळ केला खरा. ती जेतेपद मिळवण्याच्या जवळही पोहोचली होती. पण तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही आणि त्यामुळेच तिला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Exit mobile version