पीएनपी नाट्यगृहात 13 हजार 380 वा प्रयोग यशस्वी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
ज्याचं जगणं, विचार, बोलणं सगळंच नाटक आहे, असा रसिकांचा लाडका कलाकार, रंगभूमीचे बादशाह, मराठी रंगभूमीवरचा देखणा, गोंडस, जबरदस्त प्रतिभेचा, सुरेल गळ्याचा, रसिकांचा लाडका अभिनेता प्रशांत दामले यांनी आपल्या प्रदीर्घ रंगभूमी कारकीर्दीतील 13 हजार 333 प्रयोग पूर्ण करत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात 13,380 वा नाट्यप्रयोग सादर झाला, ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावर नेणाऱ्या या कलाकाराच्या विक्रमी कामगिरीमुळे अलिबागच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णपान जोडले गेले आहे. या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी संपूर्ण अलिबागकरांना लाभली. प्रयोगाच्या मध्यांतरात प्रशांत दामले यांचा पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. रंगभूमीवरील त्यांच्या अथक योगदानाबद्दल रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना किर, विक्रांत वार्डे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो नाट्यप्रेमी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून प्रशांत दामले यांच्या शिस्तप्रियता, सातत्य, साधेपणा आणि अभिनयावरील निष्ठेचे कौतुक केले.

अलिबागमधील ज्येष्ठ कलाकार, नाट्य रसिक, आयोजक संदीप गोठीवडेकर यांनी ‘शिकायला गेलो एक’ या विनोदी नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (दि.9) आयोजित केला होता. त्यात या विक्रमाची दखल घेण्यात आली. हा प्रयोग हाऊसफुल्ल होता. अलिबागकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती अथवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली कला. याचसोबत कोणतेही पात्र साकारण्यासाठी कलाकाराला त्या पात्रामध्ये उतरून ते नाटक जगावं लागतं तेव्हा एखादं नाटक सार्थकी लागतं. 13,380 प्रयोगांचा पल्ला गाठणारं दर्जेदार व्यक्तिमत्त्व, मराठी नाटककार आणि दिग्गज अभिनेते प्रशांत दामले हेसुद्धा ही तत्त्वं पाळताना दिसतात. प्रशांत दामले यांना नाटकांमध्ये विशेष रस आहे. म्हणून ते मालिका आणि चित्रपटांपेक्षा जास्त नाटकात काम करताना दिसतात. आजवर प्रशांत दामले त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मराठी चित्रपटामध्ये प्रशांत दामले हे विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात टूर टूर या नाटकापासून केली. पुढे त्यांनी ‘मोरूची मावशी’ या नाटकापासून व्यावसायिक नाटकाकडे वाटचाल केली. प्रशांत दामले हे केवळ एक अभिनेताच नाही तर एक उत्तम माणूस देखील आहेत. त्यांनी प्रशांत फॅन फाऊंडेशन नावाचे स्वतःचे फाउंडेशन सुरू केले आहे ज्याद्वारे ते समाजाच्या कल्याणासाठी सामाजिक कार्य करत असतात. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या जल कार्यक्रमासाठी 1 लाख रुपये देणगी दिली आहे.
काय होते नाटक?
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित व गौरी थिएटर्स निर्मित शिकायला गेलो एक हे नाटक एका आदर्शवादी शिक्षक आणि त्याच्या बंडखोर विद्यार्थ्याच्या नात्यावर आधारित आहे. प्रशांत दामले आणि ॠषीकेश शेलार यांच्या जोडीने रंगमंचावर तुफान रंगत आणत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सादरीकरणाने प्रेक्षकांना हास्याबरोबरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावले. या नाटकाची मूळ कथा द.मा. मिरासदार यांची असून, अद्वैत दादरकर यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे. तसेच नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अशोक पत्की, प्रकाश किशोर इंगळे तर सूत्रधार अजय कासुर्डे आहेत. या नाटकात ॠषीकेश शेलार, सुशील इनामदार, अनघा भगरे, समृद्धी मोहरीर, चिन्मय माहूरकर यांनी प्रशांत दामले यांना आपल्या उत्तम अभिनयाची साथ दिली आहे.
प्रशांत दामले यांच्या अभिनयसामर्थ्याची उंची कुणाचेही डोळे दीपवणारी आहे. अंगभूत कर्तृत्व आणि अथक परिश्रमाच्या बळावर प्रशांत दामले इथपर्यंत पोहोचले आहेत, यावर कुणाचंही दुमत होणं अवघड आहे. प्रशांत दामलेंना रंगभूमीवर बागडताना पाहणाऱ्या नाट्यरसिकांची ही तिसरी पिढी आहे. प्रशांत दामले यांचा आजवरचा रंगभूमीवरचा वावर थक्क करणारा आहे. विनोद म्हणजे प्रशांत दामले, आणि विनोदी नाटक म्हणजे प्रशांत दामले हे समीकरण तयार झालेलं आहे. अभिनेता, निर्माता, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष ही जबाबदारी ते त्याच दर्जाने पार पाडत आहेत. विश्व विक्रम करणाऱ्या मराठी रंगभूमीतील कलाकाराचा गौरव करण्याचा मान मिळाल्याचा आम्हा अलिबागकरांना प्रचंड अभिमान आहे.
– चित्रलेखा पाटील, अध्यक्षा, पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ
अलिबागमध्ये खूपदा येणं झालं आहे. अलिबागची माणसं खूप स्वच्छ आणि निर्मळ मनाची आहेत. जे नाही मिळालं, त्याचं कधीच दुःख केलं नाही, जे मिळालं त्याचा खूप आनंद आहे. चित्रलेखा पाटील यांचा खूप आभारी आहे. कारण, पीएनपी नाट्यगृह जेव्हा पहिल्यांदा झालं, त्यावेळी माझं नाटक ‘एका लग्नाची गोष्ट’ याठिकाणी झालं होतं. त्यांनतर जेव्हा दुर्घटना झाली, त्यावेळी केवळ अलिबागकरच नाही तर, रंगभूमीसृष्टीतील सर्व कलाकार, निर्माते प्रचंड हळहळले. 1995 पासून पीएनपी नाट्यगृह होईपर्यंत कलाकार अलिबागमधील सार्वजनिक वाचनालयात प्रयोग सादर करीत होतो. कोणत्याही कलाकाराच्या सादरीकरणामध्ये कोणतंही नाट्यगृह महत्त्वाची भूमिका बजावत असतं. एखाद्या नाट्यगृहात आपण कमालीचे खुललो आहोत आणि कधी तरी असं होतं की, आपण जेवढं खुलायला पाहिजे, तेवढं खुलत नाही. अशा सुसज्ज नाट्यगृहात काम करताना आमच्यासह रसिकांनाही मजा येते. या नाट्यगृहात प्रयोग सादर करताना खूप आनंद होत आहे. नाट्यगृह पुन्हा उभं करणं किती कठीण आहे, याची जाणीव आहे. चित्रलेखा पाटील यांनी खचून न जाता पुन्हा एकदा हे नाट्यगृह त्याच दिमाखात उभारले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच संदीप गोठीवडेकर यांनी अलिबागमध्ये प्रयोग सादर करण्याची संधी दिली त्याबद्दलही आभार.
– प्रशांत दामले, ज्येष्ठ अभिनेते, निर्माते







