| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये एकीकडे स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना आवश्यक ठिकाणी कचराकुंड्या लावण्याची गरज असताना मागील काळात प्रशासकीय राजवटीत नव्याने आणलेल्या कचराकुंड्या येथील शास्त्री हॉलच्या आवारात गंजत पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
पर्यटन नगरी माथेरानमध्ये बाराही महिने पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांच्या जवळ असणाऱ्या सुका कचरा यामध्ये प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि अन्य कचरा टाकण्यासाठी विविध पॉईंटस भागात कचराकुंड्या नसल्याने हा सर्व कचरा जंगलात विखुरलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. मागील काळात प्रशासकीय राजवटीत नविन कचराकुंड्या मागविल्या होत्या; मात्र, त्या नगरपरिषदेच्या नियोजनाअभावी आवश्यक ठिकाणी लावण्यात आलेल्या नाहीत. त्या माथेरान शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शास्त्री हॉल आणि हुतात्मा स्मारक या ठिकाणी पडून आहेत. त्यामुळे आता त्या गंजु लागल्या असून लवकरच त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्या भंगारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.







