| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात मुरुड-जंजिरा वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिकलसेल जागतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी वैद्यकीय अधिकारी मकबुल कोकाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल धुमाळ, तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा, आरोग्य सहाय्यक गणेश शिंदे, आरोग्य सेवक राजेंद्र चुनेकर, समूह संघटक प्राची चौलकर, इतर कर्मचारी स्थानिक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा म्हणाले की, सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्त पेशींचा आकार गोल व लवचिक असतात पेशींचे आयुष्य 120 दिवस असते, पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींना ऑक्सिजन मिळाला नाही तर विळ्यासारखे होतो, सिकलसेल पेशींचे आयुष्य हे 20ते 30 दिवस असते. डॉक्टरचा सल्ला घेणे, अँटिबायोटिक, हायड्रॉक्सीयुरिया गोळ्या घेणे रक्त वाढीसाठी फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घेणे, सिकलसेल रुग्णांनी अति परिश्रम कामे न करणे, वेळी वेळी विश्रांती घेणे, आहारामध्ये पालक, बिट, गुळ, शेंगदाणे, डाळिंब, शेवंगाची भाजी, काळे मनुके, खजूर, मासे, अंडी, संत्री, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य पदार्थ खाणे आवश्यक आहे, असे आवाहन तालुका सिकलसेल सहाय्यक शालीकराव पावरा यांनी केले. डॉ. मकबुल कोकाटे म्हणाले की सिकलसेल हा लाल पेशीमध्ये होणारा आजार आहे, सिकलसेल लक्षणे रुग्णांमध्ये रक्तक्षय कमी असणे, अशक्तपणा, हातापायावर सुज येणे, मूत्रपिंड निकामी होणे, डोळ्यावर परिणाम होणे, असह्य वेदना, जंतुसंसर्ग, शारीरिक त्रास मानसिक त्रास होत असेल तर सिकलसेल चाचणी करावी असे आवाहन डॉ. मकबुल कोकाटे यांनी केले.







