उपजीविकेच्या प्रश्नावर उपाय; रापणात कचरा आणि ऑइल आल्याने कष्ट फुकट
| मुरुड जंजिरा | सुधीर नाझरे |
सतत वादळी पाऊस, हवामानात होणारे बदल आणि एलईडीच्या बोटींची अनधिकृत मासेमारी यामुळे स्थानिक कोळी बांधवाना खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्याने हात हलवत परतावे लागले. आता उपजीविकेच्या प्रश्नावर उपाय म्हणून किनाऱ्यावर रापण मासेमारीचा कोळीबांधवांना आधार ठरला आहे.
रापणीचे जाळे मोठे असते. ते पाण्याचा मोठा भाग व्यापते. त्या जाळ्याला दोन्ही बाजूंना पन्नास ते साठ वाव जाड काथ्याचा दोरखंड, पन्नास ते साठ पाटे जोडून, पंधरा फूट उंची राखली जाते. मधील घोळाच्या भागाला पाटे मजबूत लावले जातात. जाळ्याच्या सुरुवातीला व दोरखंडाच्या शेवटी पंधरा फूट उंचीचा मजबूत उंडलीचा दांडका लावलेला असतो. रापण ओढणे हे येरागबाळ्यांचे काम नाही. त्याला कंबर मजबूत व ताकद भक्कम लागते. दोरखंड माणसांकडून त्यांचे पाय मातीत, वाळूत खोलवर रोवून ओढला जातो. ती माणसे फार श्रमाचे काम उपाशी पोटी करतात. जाळे किनारी आल्यावर जाळ्यात मासे मिळाले नाही तर पुन्हा हा कष्टच खेळ सुरु राहतो. मासे पूर्णत: किनाऱ्यावर घेतल्यानंतर ज्यांना मासे विकत घ्यायचे असतात ती मंडळी पुढे सरसावत; पैसे देऊन मासे खरेदी करत. शिल्लक राहिलेले मासे सर्वांमध्ये वाटले जात. अशा प्रकारे सकाळी 4 वाजता सुरु झालेले रापण दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहते. पावसाळी कोळीबांधवांच्या उपजीविकेसाठी लागणारा कष्टाचा अनुभव सामान्य माणसाला कधी समजणार आणि शासन याकडे कधी लक्ष देणार, अशी चर्चा कोळीबांधवांमध्ये आहे.
मुरुडमध्ये मच्छिमार बोटी 300 आहेत. परंतु त्यातील 50 बोटींना काम आहे. बाकीच्यांना खलाशाांचे पगार देणे होत नाही. सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे व एलईडीच्या बोटींची अनधिकृत मासेमारीने मुरुडचा कोळी बांधव खचला आहे. आता तर पावसाळा सुरु झाला. बोटी किनारी आल्या. आता कोळी बांधव रोज सकाळी 4 वाजता उठून समुद्राच्या भरतीवेळी उसळल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळीला पकडण्यासाठी 20 ते 30 तरुण बांधव लागतात. दुपारपर्यंत रापण करून जे मासे मिळतात ते विकून आपला वाटा घेऊन घरी यायचे असा दिनक्रम पुढील 2 महिने सुरु राहणार आहे. जे शारीरिक कमकुवत आहे. ते बांधव गवंडी कामात व रंग कामात लागतात, अशी कोळी बांधवाची स्थिती पूर्वी नव्हती आम्हा कोळी बांधवांच नेमकं काय चुकल?
प्रकाश सरपाटील
(मच्छिमार)






