डिंग लिरेनला जगज्जेतेपद

नेपोम्नियाशी सलग दुसर्‍यांदा उपविजेता

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

ग्रँडमास्टर डिंग लिरेनने ऐतिहासिक कामगिरी करताना चीनचा पहिला जगज्जेता बुद्धिबळपटू म्हणून मिरवण्याचा मान मिळवला. लिरेनने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या ‘टायब्रेकर’ मधील चौथ्या व अखेरच्या डावात रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोम्नियाशीवर मात केली. त्यामुळे नेपोम्नियाशीला सलग दुसर्‍यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर लिरेन 17वा जगज्जेता ठरला.

लिरेनच्या विजयामुळे बुद्धिबळविश्‍वाला 2013 नंतर प्रथमच नवा जगज्जेता मिळाला आहे. विश्‍वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मॅग्नस कार्लसनने यंदाच्या जागतिक लढतीतून माघार घेतली होती. त्यामुळे लिरेन व नेपोम्नियाशी यांना जगज्जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विजय मिळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

लिरेन आणि नेपोम्नियाशी यांच्यात 14 डावांअंती 7-7 अशी बरोबरी होती. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद लढतीचा विजेता ठरवण्यासाठी ‘टायब्रेकर’ चा अवलंब करण्यात आला. रविवारी झालेल्या जलद (रॅपिड) ‘टायब्रेकर’ मधील पहिले तीन डाव बरोबरीत सुटले. मात्र, चौथ्या डावात लिरेनला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आले.

चौथ्या डावात पांढर्‍या मोहर्‍यांनिशी खेळणार्‍या नेपोम्नियाशीने ‘रुइ लोपेझ’ पद्धतीने सुरुवात केली. लिरेनने 11व्या चालीत आपला मोहरा ‘ए4’ वर नेला आणि अदलाबदलीला सुरुवात केली. पटावरील स्थिती पाहता हा डावही बरोबरीत सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, लिरेनने 90 सेकंदांपेक्षाही कमी वेळ शिल्लक असतानाही आक्रमक चाली रचल्या आणि नेपोम्नियाशीवर दडपण आणले. अखेर नेपोम्नियाशीचा खेळ खालावला व लिरेनने जेतेपद मिळवले.

Exit mobile version