400 मीटर उंच लावा उसळला
| हवाई | वृत्तसंस्था |
जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुख्यांपैकी एक मानला जाणारा हवाईमधील कीलाउआ पुन्हा एकदा भडकला आहे. ज्वालामुखीतून तब्बल 400 मीटर (1300 फूट) उंच लाव्हा आणि धुराचे फवारे उसळताना दिसले. या भीषण दृश्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, वैज्ञानिकांनी याला अलिकडच्या दशकातील सर्वात तीव्र ज्वालामुखी उद्रेकांपैकी एक म्हटले आहे.
अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणने रविवारी पहाटे जाहीर केले की, कीलाउआच्या हलंमाउमाउ क्रेटरमध्ये प्रचंड उद्रेक सुरू झाला आहे. या वेळी क्रेटरच्या आत तिन्ही दिशांनी समान उंचीपर्यंत तीन लाव्हा फव्वारे उडताना दिसत आहेत. हा कीलाउआच्या इतिहासातदेखील फार दुर्मिळ क्षण आहे. स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11:45 च्या सुमारास उद्रेक सुरू झाला. काही मिनिटांतच आकाश लाव्हारसामुळे पूर्णपणे लाल झाले. सध्या लावा क्रेटरच्या आतच मर्यादित असून हवाई व्होल्केनोज नॅशनल पार्कच्या बाहेरील परिसराला तत्काळ कोणताही धोका नाही. उद्रेकाचा भाग असलेला पार्क परिसर आधीच बंद करण्यात आला आहे. हवाई वोल्केनो ऑब्झर्वेटरीचे प्रमुख वैज्ञानिक केन होन म्हणाले, हा अत्यंत दुर्मीळ आणि असामान्य उद्रेक आहे. तीनही फव्वारे एकाच उंचीवर उसळताना पाहणे म्हणजे निसर्गाची प्रचंड शक्ती अनुभवण्यासारखे आहे. सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान नोंदले गेलेले नाही. आसपासच्या भागात हलकी राख पडण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.






