माथेरानमध्ये रंगली कुस्ती स्पर्धा

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये गुढीपाडव्यानिमित कुस्ती स्पर्धेचे आयोजन अनेक दशकांपासून करण्यात येत आहे. माथेरानच्या या लाल मातीत रंगलेल्या या कुस्ती स्पर्धेला येथे यावर्षी देखील राज्यभरातून आलेल्या पैलवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे या कुस्ती स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ उत्सव मंडळाकडून घेण्यात आला होता. परंतु कुस्ती मैदानाची पाहणी केल्यावर कुस्त्यांचे सामने खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी या मंडळाचे अध्यक्ष विकास पार्टे, उपाध्यक्ष शैलेंद्र दळवी, सचिव कुलदीप जाधव, खजिनदार वीरेंद्र शिंदे, अनंता शेलार, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, प्रदीप शिंदे आणि मंडळातील सर्व सहकार्‍यांनी मिळून या कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. येथील सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. चिमुरड्यांच्या कुस्तीने श्री राम मंदिर पटांगणात कुस्ती स्पर्धेला सुरवात झाली. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक पैलवान, कुस्तीपट्टूनी लक्षवेधी कामगिरी करत आपापल्या कुस्त्या जिंकून उपस्थित प्रेक्षकांना बेहद खुश करून पारितोषिका बरोबरच त्यांची मने देखील जिंकली. विजयी पैलवानांना ग्रामस्थ उत्सव मंडळाच्या वतीने रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रकाश सुतार, विजय चौधरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेला माथेरान नागरिकांचा, पर्यटकांचा आणि कुस्ती शौकिनांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Exit mobile version