। पुणे । प्रतिनिधी ।
केवळ साहित्य विश्वच नाही तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार अनिल अवचट यांचे दिर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. आज दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनिल अवचट यांनी व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करत नव्याने आयुष्य जगता यावं यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते, मात्र त्यांनी समाजसेवेतही मोलाचं योगदान दिलं. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी राहिले. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक होते. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते. मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळविणार्यांमध्ये पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. नागराज मंजुळे, प्रमोद उदारसारख्या मान्यवरांचा समावेश आहे.
डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं.