निधी न दिल्यामुळे पंचायत समिती समोर आंदोलन
। उरण । वार्ताहर ।
शासनाच्या आदेशानुसार ग्राम पंचायत, पंचायत समिती तर्फे देण्यात येणारा 5 टक्के निधी मागील अनेक वर्ष न दिल्यामुळे उरण तालुक्यातील दिव्यांग संघटनेकडून अनेकवेळा निवेदन देवून देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी (दि.10) पंचायत समिती उरण येथे मोर्चा काढला.
गटविकास अधिकारी निलम गाडे यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले की, चाणजे ग्रुप ग्रामपंचायती मार्फत दिव्यांग व्यक्ती करिता 5 टक्के निधी खर्च करण्यात येणार आहे. परंतु त्याची पूर्तता न केल्यामुळे शुक्रवारी दिव्यांग बांधवांनी उरण पंचायत समितीवर मोर्चा नेला. यावेळी अधिकार्यांनी चाणजेचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या सोबत चर्चा केली आहे. या चर्चेमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कटाक्षाने पूर्ण करण्याबाबत सरपंच व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत चाणजे यांना देण्यात आल्या. 31 डिसेंबर महिन्याच्या तारखेच्या आत निधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतीचा 5 टक्के मधील दिव्यता निधीचा खर्च माहे मार्च 2022 अखेर 100 टक्के दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
सदर मोर्चाला गट विकास आधिकारी निलम गाडे, उरण पंचायत समिती सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, माजी सभापती सागर कडू, उरण पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, बेरोजगार अपंग जीवन विकास समाज कल्याण संस्था उरण चे सर्व सदस्य, दिव्यांग संघटना अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष महेंद्र म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी, चाणजे सरपंच मंगेश थळी, दिव्यांग बांधव व ग्रामसेवक उपस्थित होते.