| जयपूर | वृत्तसंस्था |
यशस्वी जैस्वाल आपल्या उत्कृष्ट फलंदाजी कौशल्यासह आयपीएलमध्ये दुसरे शतक झळकावत सर्वांनाच प्रभावित केले आहे. सोमवारी राजस्थान विरूद्ध मुंबईमध्ये झालेल्या सामन्यात यशस्वी जैस्वालची बॅट पुन्हा एकदा चांगलीच तळपताना दिसली. राजस्थानकडून सलामीला आलेला यशस्वी 104 धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. आयपीएलच्या सुरूवातीपासूनच खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या यशस्वीवर संघाने विश्वास दाखवला आणि जैस्वालनेही त्यांना निराश न करता थेट शतकी खेळी करून दाखवली. यशस्वीने 60 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकार ठोकले आणि 173.33 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 104 धावा केल्या. या शतकी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी नावे केली आहे.
आयपीएलमध्ये दोन शतके झळकावणारा यशस्वी जैस्वाल हा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. वयाची 23 वर्षे पूर्ण होण्याआधीच यशस्वीने सर्वात कमी वयात दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. यशस्वीचे वय 22 वर्षे 116 दिवस इतके आहे. या वयापर्यंत त्याने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये एवढ्या कमी वयात ही कामगिरी एकाही फलंदाजाला करता आलेली नाही. यशस्वीने हा दुर्मिळ विक्रम आपल्या नावावर केला आहे.राजस्थानच्या घरच्या मैदानावरील शतकापूर्वी यशस्वीने गेल्या वर्षी वानखेडेवर शतक झळकावले होते. योगायोगाने त्याचे पहिले शतकही मुंबई इंडियन्सविरुद्धचं होते. त्यावेळी त्याचे वय अवघे 21 वर्षे 123 दिवस होते. तर आता दुसरे शतकही त्याने मुंबई इंडियन्सविरूद्धच झळकावले आहे.
यशस्वी आयपीएल सुरू झाल्यापासून खराब फॉर्ममध्ये होता, पण त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात पुनरागमन करत आपली लय परत मिळवली आणि संघाला 8 चेंडू बाकी असताना 9 गडी राखून नेत्रदीपक विजय मिळवून दिला. कमी वयात अनेक विक्रम आपले नावे करू पाहणार्या यशस्वीचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय टी-20 शतक आहे. जैस्वालने चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. त्याने 204 च्या स्ट्राईक रेटने 49 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह शतक पूर्ण केले.