यशश्री शिंदे, श्रद्धा भोईर प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा

जनवादी महिला संघटनेची मागणी

। उरण । वार्ताहर ।

उरण परिसरात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून येत आहे. तरी पोलिसांनी अशा गुन्हेगारांना आळा घालावा, तसेच यशश्री शिंदे व श्रद्धा भोईर प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्याची मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने पोलीस उपायुक्त यांना केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून उरणमध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली आहे. हे गंभीर असून, पोलिसांनी अशा गुन्हेगाराला तातडीने आळा घालावा, अशी अपेक्षा महिला व्यक्त करीत आहेत. पीडितांना न्याय मिळून आरोपींना कडक शिक्षा व्हावी. तसेच यशश्री शिंदे व श्रद्धा भोईर हे दोन्ही खटले जलद गतीने न्यायालयात चालवावे, गुन्ह्याला धार्मिक रंग देऊ नये, महिलांवरील तक्रारीची दखल पोलिसांकडून त्वरित घेतली जावी. यशश्री शिंदे प्रकरणात ती घेतली असती तर तिचा जीव वाचला असता, एखादी महिला बेपत्ता, एकतर्फी प्रेम, जबरदस्ती करीत असेल, ब्लॅकमेल करणे आदी घटना त्वरित दखल घेऊन कारवाई करणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त वाढविणे, महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करून ती महिलांपर्यंत पोहोचवून सतत कार्यरत व प्रभावी असावी, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने पोलीस उपयुक्तांना दिलेल्या निवेदनात केले आहे. यावेळी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता पाटील, सोन्या गिल, सरचिटणीस प्राची हातीवलेकर, सहसचिव रेखा देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version