। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील राबगाव येथील वरदायनी देवीची यात्रा शनिवारी (दि.12) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारच्या सुमारास या यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे राबगाव व चार वाड्यांमधून महादेवाच्या काठ्या नाचवत आणल्या जातात. यावेळी ढोल-ताशांच्या तालावर या सजवलेल्या काठ्या तरुणांसह काही ज्येष्ठ मंडळींनी मोठ्या हावशीने नाचवल्या. देवीच्या यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. यात्रेमध्ये मिठाईची दुकाने, खेळणींची दुकाने, विविध खाद्याचे स्टॉल लावण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतर वरदायनी देवीची पालखी मंदिरातून हरीनामाच्या जयघोषात निघून संपूर्ण गावात फिरविण्यात आली. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येकाने आपआपल्या घरासमोर रांगोळी काढून पताका लावून सजावट केली होती.