शिंदे गटाचा भाजपाला अप्रत्यक्ष संदेश; मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरुन वादंग
| खास प्रतिनिधी | रायगड |
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीचा चांगला विकास साधला आहे. खासदार शिंदे यांची ओळख आता इन्फ्रामॅन म्हणून होते. त्यामुळे त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करावे, असे साकडे शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी घातले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणे आता भाजपा के बस की बात नही, असा अप्रत्यक्ष संदेश शिंदे गटाने भाजपाला दिल्याचे बोलले जाते. आगामी कालावधीत महामार्गासाठी शिंदे गट विरुद्ध भाजपा असा सामना रंगला तर कोणाला नवल वाटायला नको.
काहीच दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत खराब रस्त्यांमुळे चाकरमान्यांना दोन दिवस रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना द्यावी. तेच हे काम पूर्ण करुन कोकणवासियांना न्याय मिळवून देतील, अशी आशा शिंदे गटाच्या पदाधिकार्यांना आहे.
सत्तेत असल्यापासून सातत्याने या महामार्गाची पाहणी करणारे मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक प्रकारे डिवचल्याचे बोलले जाते. महामार्ग सुस्थित करण्यासाठी संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी 10 ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे भाजपाचे मंत्री हे आव्हान पेलणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या 12 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रडतखडत सुरु आहे. सध्या तर महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. या मार्गावरुन प्रवास करणे म्हणजे वाहनचालकांसह प्रवाशांच्या डोक्याला ताप, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुनदेखील महामार्गाचे काम पूर्ण होत नाही. दरवर्षी जनतेच्या पैशांची लूट सुरु असून, ठरावीक लोक यातून गब्बर होत आहेत.
काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. या कालावधीत लाखो चाकारमानी कोकणात सण साजरा करण्यासाठी जातात. प्रवास करताना त्यांना याच मुंबई-गोवा महामार्गावरुन जावे लागते. गेल्या 12 वर्षांपासून येथील प्रवास खडतर झाला आहे. सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याने या महामार्गाने हजारो निष्पांपाचे बळी घेतले आहेत. मात्र, सरकारला याचे काही देणे घेणे राहिलेले नाही.
महामार्ग 10 ऑगस्टपर्यंत सुस्थित करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या महामार्गावरुन फेरफटका मारला होता. त्यांच्या पोठोपाठ मंत्री रवींद्र चव्हाण यांनीदेखील हौस भागवून घेतली. मंत्री, खासदार दौरे करतात. त्याच्या पुढे कार्यवाही काहीच होत नसल्याने जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाआधी तातडीने महामार्ग सुस्थित करण्याबाबतचे निवेदन शिंदे गटाचे पदाधिकारी राजेश कदम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. बांधकाम मंत्रालयाच्या अधिपथ्याखाली महामार्ग येतो. त्यामुळे भाजपाचे संबंधित खात्याचे मंत्री महामार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी एक प्रकारे शिंदे गटाने गडकरी यांच्याकडे तक्रार केल्याचे बोलले जाते.