स्वयंसहाय्यता समूह हळदीच्या उत्पादनासाठी पुढाकार; माणगावात उघडणार सिड बँक
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावातील स्वयंसहाय्यता महिला समूहातून पिवळ्या सोन्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच पिवळी क्रांती उदयाला येईल यासाठी या महिलांनी चांगलीच कंबर कसली असून, यंदा मोठ्या प्रमाणात हळद पिकाची लागवड केली आहे. इथेच न थांबता या उत्पादनातून ‘सीड बँक’ स्थापन करणार असून, पिवळ्या सोन्याला त्यामुळे नवी झळाळी मिळणार आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान हे शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून राबविले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसहाय्यता समूह तयार करून पूर्वी बीपीएलखाली लोकांचे गट तयार केले जात होते. यांचे रूपांतर उमेदमध्ये करण्यात आले. यातून गरिबांच्या संस्था तयार करून त्यांना दशसूत्रीच्या माध्यमातून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याचे काम सुरु आहे. त्याप्रमाणे गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ असे निर्माण केले. गट 10 ते 12 महिलांचा गट, ग्रामसंघात 10 ते 12 गट, प्रभागसंघात 21 प्रभागसंघ निर्माण करण्यात आले. प्रभागसंघ हा प्रभागातील सर्व गट ग्रामसंघावर नियंत्रण ठेवून योजना आखतो. त्यांना लागणारे मार्गदर्शन हे उमेदतर्फे करण्यात येते. माणगाव तालुक्यातील स्वयंसहाय्यता समूहांनी यंदाचे वर्षी माणगाव पंचायत समिती कृषी विभाग व उमेद अभियानामार्फत सेलम जातीचे 3 टन, 90 रुपये किलोप्रमाणे 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे बियाणे सांगली येथून आणले. ते बियाणे समूहाला दिले. त्याची लागवड समूहातील महिलांनी आपापल्या शेत व परसावात तसेच घराभोवती उपलब्ध असणार्या जमिनीत केली.
माणगाव तालुक्यात हळद पिकला पोषक जमीन व अनुकूल हवामान असल्याने यंदाचे वर्षी स्वयंसहाय्यता समूहांनी केलेल्या लागवडीतून प्रचंड उत्पादन मिळणार आहे. त्यातूनच पिवळी क्रांती उदयाला येणार आहे. ही लागवड जूनअखेरला केली असून, सेलम जातीचे हळदीचे हे पीक साडेआठ ते नऊ महिन्यांत तयार होणार आहे. 3 टन हळद लागवड केली असून, त्यातून ओली हळद 30 ते 40 टन म्हणजेच 30 ते 40 हजार किलो सरासरी उत्पादन मिळणार आहे. त्यातून प्रकिया करून 6 टन पावडर म्हणजेच 6 हजार किलो सरासरी पावडर तयार होईल. सध्या बाजारात उच्च प्रतीच्या व सेंद्रिय शेतीतून तयार होणारी ही हळद बाजारात 300 रुपये किलो दराने विकली जाते. मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मिक्स हळद मिळत असून, त्याचे दर या तुलनेत कमी असतात. माणगाव तालुक्यात स्वयंसहाय्यता समूहाकडून उत्पादित होणारी हळद ही सेंद्रिय शेतीतून मिळणारी गुणवत्ताधारक असणार आहे. त्यामुळे या पिवळ्या सोन्याला नवी झळाळी मिळणार आहे. स्वयंसहाय्यता समूहाच्या मागणीनुसार, माणगाव पं.स. गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी क्रांती महिला प्रभाग संघ, प्रवाह प्रभाग संघ, ऊर्जा प्रभाग संघ, स्वाभिमान प्रभाग संघ, पदाधिकारी, समुदाय संसाधन व्यक्ती, पं.स, कृषी विस्तार अधिकारी शिवदत्त परजणे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक समीर चांदे, तालुका व्यवस्थापक रवींद्र शिंदे, प्रभाग समन्वयक स्वप्नील गोसावी, वर्षा इनामदार परिश्रम घेत आहेत.
स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी उत्पादित केलेली हळद पिकावर दोन प्रोसेसिंग युनिट त्या भागात उभारून त्या महिला समूहांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. तसेच यातून सीड बँक स्थापन केली जाणार आहे. त्यातून ज्या समूहाला हे बियाणे दिले त्यातून मिळणार्या हळद पिकातून एका किलोस दोन किलो परत बियाणे घेऊन ते सीड बँकेत साठवले जाणार आहे. साठवलेली हळद इतर दुसर्या समूहाला पुढच्या वर्षी देऊन तालुक्यात जात उत्पादन देण्याचा मानस आहे.
संदीप जठार,
गटविकास अधिकारी,
माणगाव पं.स.