विराट कोहलीचा आत्मविश्वास
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केवळ चाहतेच नाही तर भारतीय क्रिकेट संघालाही विश्वचषक जिंकायचा आहे. गेल्या 15 वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाची सेवा करत असून मला आव्हाने घ्यायला आवडतात. असे रोखठोक प्रतिपादन क्रिकेटपटू विराट कोहलीने व्यक्त केले आहे. आशिया चषक, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना विराटने आपली मते मांडली आहेत. तो म्हणाला की, विराट कोहली म्हणाला, तुमच्यासमोर कोणतेही आव्हान असो, तुम्ही ते नेहमी सकारात्मक पद्धतीने घेतले पाहिजे. मी नेहमी अशा आव्हानांची वाट पाहत असतो. जेव्हा तुमच्या मार्गावर कोणतरी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तुम्ही जोमाने त्याला प्रत्युतर दिले पाहिजे. त्यापासून तुम्ही मागे हटता कामा नये. 15 वर्षांनंतरही, मला स्पर्धात्मक खेळ खेळायला आवडतो. विश्वचषक 2023 हे मला उत्तेजित करणारे एक आव्हान आहे. मला नवीन आव्हाने स्वीकारायला आवडतात, त्यातून मला एका वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते.असे तो म्हणाला.
दबाव हा नेहमीच असतो. चाहते नेहमी म्हणतात की, आम्हाला (संघाला) यावेळी विश्वचषक जिंकायचा आहे. जे त्यांच्या मनात आहे तेच आमच्याही मनात आहे. मला यापेक्षा जास्त काही सांगायला आवडणार नाही. त्यामुळे मी योग्य मार्गावर आहे. खरे सांगायचे तर मला माहित आहे की संघाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत आणि लोकांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्हालाही चषक जिंकावासा वाटतो, त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू.
विराट कोहली, क्रिकेटर
विराट कोहलीसाठी विश्वचषक जिंकणे हे काही नवीन नाही. 2008 मध्ये आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत त्याने भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर 2011 मध्ये मायदेशात 50 षटकांचा विश्वचषक जिंकणाऱ्या एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचाही तो भाग होता. विराट यावर म्हणाला, 2011 मध्ये विश्वचषक जिंकणे हे माझ्या कारकिर्दीचे मुख्य आकर्षण आहे. त्यावेळी मी 23 वर्षांचा होतो आणि कदाचित मला त्या वयात त्याची महानता समजली नसेल. पण आता वयाच्या 34व्या वर्षी आणि इतके विश्वचषक खेळूनही जे आम्ही जिंकू शकलो नाही, त्यावेळी मला 2011च्या वर्ल्डकपवेळी सर्व वरिष्ठ खेळाडूंच्या भावना काय असतील याचा मी विचार करतो. सचिन तेंडुलकर यांच्यासाठी तो आणखीनच जास्त होता कारण हा त्यांचा शेवटचा विश्वचषक होता. तोपर्यंत त्यांनी अनेक विश्वचषक खेळले होते आणि मुंबईत आपल्या घरी जिंकणे त्यांच्यासाठी खूप खास होते, म्हणजे ती घडलेली घटना एका स्वप्नासारखी होती.असे तो म्हणाला.
सोशल मिडियाचा दबाव
2011च्या विश्वचषकापूर्वी आणि त्यादरम्यान खेळाडूंवर पडलेल्या दबावाची आठवणही कोहलीने सांगितली. तो म्हणाला, मला आठवते की आम्ही प्रवास करत असताना सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया एवढा सक्रिय नव्हता. खरे सांगू त्यावेळी जर सोशल मीडिया असता तर आमच्यासाठी विश्वचषक हे एक दिवास्वप्न ठरले असते. आम्हाला त्यावेळी एकच गोष्ट माहित होती ती म्हणजे वर्ल्ड कप जिंकायचा आहे. वरिष्ठ खेळाडू नेहमी उत्साहात असायचे आणि दडपण सहन करायचे. ते दिवस खूप भारी होते. विश्वचषक जिंकल्यानंतरची ती रात्र कधीच विसरू शकत नाही. याची आठवणही त्याने करुन दिली.