पॅरालिम्पिक खेळाडूंशी साधला संवाद
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
तुम्ही खरे चॅम्पियन आहात. तुम्ही जीवनाच्या खेळातील संकटांचा पराभव केला आहे आणि कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटांमध्येही सराव थांबू दिला नाही. तुम्ही येस वी विल डू इट, वी कॅन डू इट हे दाखवून दिले. खेळाडू म्हणून पदके महत्त्वाची असतात, पण नवीन भारत आपल्या खेळाडूंवर पदकांसाठी दबाव आणत नाही. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे टोक्यो 2020 पॅरालिम्पिक गेम्समध्ये सहभागी होणार्या पॅरालिम्पिक्स संघाशी संवाद साधला. यावेळी एकूण 9 क्रीडा स्पर्धांमधील 54 पॅरा धावपटू देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी टोक्योला जातील. पॅरालिम्पिक गेम्समध्ये भाग घेणारी ही आतापर्यंतची सर्वात मोठी भारतीय तुकडी आहे. टोक्योमध्ये 24 ऑगस्टपासून पॅरालिम्पिक खेळ सुरू होत आहेत, जे 5 सप्टेंबरपर्यंत चालतील. या संवादादरम्यान केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूरही उपस्थित होते.
आपली सर्व शक्ती पणाला लावा,चांगले खेळा. तुम्ही विजयी झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की भेटेन आणि तुमचे अनुभव जाणून घेईन. आपण पॅरालिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहात.सर्वतोपरी प्रयत्न करा, पण कोणतेही दडपण घेऊ नका. जर तुम्ही टोक्योमध्ये तिरंग्यासह सर्वोत्तम कामगिरी केली तर तुम्ही केवळ पदके जिंकणार नाही, तर नवीन भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा द्याल असे नरेंद्र मोदी खेळाडूंशी संवाद साधतांना म्हणाले.
- भारतात क्रीडा संस्कृती विकसित करण्यासाठी, आपल्याला आपल्या पद्धतींमध्ये सतत सुधारणा करावी लागेल. आज आंतरराष्ट्रीय खेळांबरोबरच पारंपारिक भारतीय खेळांनाही नवी ओळख दिली जात आहे. तुम्ही कोणत्याही खेळांशी संबंधित असोत, तुम्ही एक भारत श्रेष्ठ भारतची भावना देखील बळकट करता. – नरेंद्र मोदी,पंतप्रधान