| कोल्हापूर | प्रतिनिधी |
गोकुळ दूध संघाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या संघर्षात आता सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. “तुम्ही सुरुवात केली, आम्ही शेवट करणार,” असा इशारा देत त्यांनी आगामी काळात संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. “तुम्ही आमची कळ काढली, आम्ही कळ काढली नव्हती. तुम्ही सुरुवात केली, आम्ही समाप्त करणार. याचना नही अब रण होगा, रण ऐसा होगा फिर कभी जैसा नही होगा,” अशा शब्दांत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
गोकुळच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत असून, हा लढा केवळ एका दूध संघापुरता मर्यादित नसून, न्यायासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळच्या मुद्द्यामुळे सामान्य माणसालाही संघर्षातून विजय मिळू शकतो, हा विश्वास निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. कोल्हापुरातून 2029 मध्ये राज्यातील सत्तापरिवर्तनाची बीजे रोवली गेली असल्याचा दावाही त्यांनी केला. गोकुळमधील चार संचालकांच्या नियुक्तीवरून मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत लोकशाही संपविण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेचा गैरवापर करून जर गोकुळवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, तर हा लढा आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहणार नाही. तुम्ही आमची नको तिथे कळ काढली आहे, आता आम्ही गप्प बसणार नाही आणि सोडणारही नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. शाहू महाराजांच्या भूमीत सहकाराचा कायदा पायदळी तुडवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोल्हापूरची जनता कधीही माफ करणार नाही, असा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.
येताना चालत येतील, पण जाताना...
राजू शेट्टींचा महायुतीला थेट इशारा
गोकुळमध्ये शासन नियुक्त संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकार, महायुती आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. उद्या होणाऱ्या अध्यक्ष निवड सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत शासन नियुक्त संचालकांना थेट इशारा दिला आहे. शासन नियुक्त संचालक उद्याच्या अध्यक्ष निवडीच्या सभेला आले तर ते आत येतील. मात्र, बाहेर जाऊ शकणार नाहीत. येताना चालत येतील, पण जाताना खांद्यावरून जातील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. उद्या गोकुळ कार्यालयावर घेराव घालायचा का, असा सवाल करत त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहनही केले. महायुतीचे नेते आपली माणसे आणि कार्यकर्ते आणणार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगत, तुम्ही तुमचे लोक आणा, आम्हीही आमची माणसे आणतो. एकदा काय ते होऊन जाऊ दे, असे आव्हान त्यांनी दिले.
होत नसेल तर टेस्ट ट्युब बेबी
राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांची टीका
सत्ताधारी पक्षाला त्यांचे बारा आत गेले, की काय करतील याची खात्री नाही म्हणून ते पाठवत नाहीत. परंतु, लोकशाहीमध्ये असे करणे बरे नाही, रेटारेटी करणे योग्य नाही. टेस्ट ट्युब बेबीचा कधी वापर करतात? जर होत नसल्यावर टेस्ट ट्युब बेबीची वेळ येते ना. माझी सरकारला विनंती आहे की ही टेस्ट ट्युब बेबी मागे घ्यावी. हा अध्यादेश मागे घ्यावा, असेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले.
गोकूळ दूध संघात सत्ताधारी पॅनलचा पराभव होऊनही आता चार स्वीकृत संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे पाप केले जात आहे. पूर्वी दोन तज्ज्ञ स्वीकृत संचालक निवडून देण्याचा शिरस्ता होता. हॉलमध्ये गर्दी होऊ नये म्हणून ही पद्धत होती. परंतु, सतेज पाटलांचे बहुमत मोडून काढण्यासाठी चार स्वीकृत संचालक नेमले गेले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे पाप करण्यात आले. फडणवीस यांना संशयाचा फायदा देता येतो. पण, फडणवीसांची जरी इच्छा नसली, तरी त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने नोटीफिकेशन काढण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हणाले.
गोकुळची सत्ता मागच्या दाराने बळकावण्याचा डाव!
विश्वजित कदमांचा सरकारवर हल्लाबोल
गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी दिलेला कौल महायुती सरकारने स्वीकारायला हवा होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने आणि मागच्या दाराने गोकुळची सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केला.
गोकुळच्या संचालकांमधूनच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले गेले पाहिजेत. सरकारने अध्यादेश काढून शासकीय संचालक नेमण्याचा डाव आखल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना, गोकुळचा विषय कोल्हापूरचा असेल तर न्यायालयीन लढ्यासाठी दिल्लीचा वकील कशाला आणला, असा टोला त्यांनी लगावला.
निकाल काहीही लागो, कोल्हापूरची जनता बंटी पाटलांच्या पाठीशी आहे. सांगलीची जनताही तुमच्यासोबत आहे. लोकसभा निवडणुकीत मी कंडका पाडला, आता तुम्ही कंडका पाडा, असे आवाहन करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. “खटक्यावर बोट, जागेवर पलटी,” या घोषणेने त्यांनी भाषणाचा समारोप केला.
विरोधकांना रस्त्यावर फिरू देणार नाही!
खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचा थेट इशारा
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील यांच्या विरोधात राजकीय खेळी करणाऱ्यांना आता रस्त्यावर फिरणेही कठीण करू, असा थेट इशारा माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिला. “विरोधकांना रस्त्यावर फिरू देणार नाही,” असे ठणकावत त्यांनी महायुती सरकारला आव्हान दिले. त्यांच्या या आक्रमक इशाऱ्याने संघर्ष मोर्चात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात बोलताना मोहिते-पाटील म्हणाले, बंटी पाटील माझ्या तालुक्याचे जावई आहेत. त्यामुळे मला येथे यावेच लागणार. माझ्या अंगात थोडे रक्त कोल्हापूरचेही आहे. सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र बंटी पाटलांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील यांना एकटे समजू नका, असा संदेशच त्यांनी विरोधकांना दिला.
गोकुळला चोरमन नको, चेअरमन हवा!
विवेकानंद पाटलांचा सरकारवर घणाघात
शेतकऱ्यांच्या कष्टावर उभ्या राहिलेल्या गोकुळची सत्ता मागच्या दाराने बळकावण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. गोकुळला चोरमन नको, तर लोकांनी निवडून दिलेला चेअरमन हवा, अशा शब्दांत विवेकानंद पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“गोकुळात नंदाच्या घरी कृष्ण वाढतो आणि मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो,” असा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हशींच्या दुधावरून सुनावले. आमच्या म्हशी गोकुळची सत्ता तुम्हाला मिळावी म्हणून फळत नाहीत; त्या त्यांच्या धन्याला दूध मिळावे म्हणून फळतात, असेही ते म्हणाले. शासकीय संचालकांना मतदानाचा अधिकार देणे हा दूध उत्पादकांवर अन्याय असल्याचे त्यांनी ठणकावले.
सकाळी अंधारात उठून आमच्या महिला दूध काढतात, शेण-घाण काढून त्यांचे हात कुजतात. नामनिर्देशित संचालकांच्या घरातील महिलांना धार काढताना दाखवा, असे आव्हान देत त्यांनी तज्ज्ञ संचालकांची तुलना ‘फुकटच्या म्हशीमागे रेडकू’ अशी केली. विकासाची खाज असेल तर आधी राधानगरी धरणाची गळती काढा, असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान देत, “तुमच्याविरोधात अपक्ष म्हणून उभा राहतो,” असेही त्यांनी जाहीर केले.
