पतसंस्थांकडे तरुण वर्ग आकृष्ट झाला पाहिजे

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
पतसंस्थांमध्ये आर्थिक व्यवहार करतांना नेट बँकिंग, फोन पे, एटीएम सारख्या सुविधा उपलब्ध करुन देणे ही काळाजी गरज आहे. पतसंस्थांच्या कार्य विस्तार वाढीसाठी आधुनिक सुविधा दिल्या पाहिजेत. त्या शिवाय युवक वर्ग आकर्षित होणार नाही असे प्रतिपादन रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.पाटील यांनी ग्राहक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना केले.

जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुडतर्फे चेहेर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात अ‍ॅड. पाटील बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, नव्या सहकार नियमा प्रमाणे जामिनदाराची जबाबदारी कर्जदाराइतकीच महत्वाची उरते असे सांगून पतसंस्थेच्या ग्रॉस एनपीएचे प्रमाण शून्य टक्के येण्यासाठी वक्तशीर कर्जाची परतफेड कर्जदाराने करावी असे आवाहन त्यांनी केले. 97 व्या घटना दुरुस्तीला सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्याने क्रियाशील व अक्रियाशील सभासद हा निकष काढून टाकल्याने पतसंस्थांचे एकार्थी नुकसानच झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.नियामक मंडळ शासनाने नियुक्त केल्याने पतसंस्थांवर बंधने आली आहेत. ठेवी स्विकारणे, कर्ज देणे व लॉकर सुविधा व्यतिरिक्त व्यवसायावर निर्बंध घालण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच श्रीराम पतसंस्थेच्या पारदर्शी कारभाराची वाखाणणी केली.

यावेळी रायगड पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जे.टी. पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी, सचिव योगेश मगर, जयश्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन अ‍ॅड. मोहन तांबडकर, अशोक गोखले, सुवर्णा चवरकर, संचालक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करतांना अ‍ॅड. मोहन तांबडकर म्हणाले की, तालुक्यातील अग्रगण्य संस्था असून सर्व सामान्यांच्या विश्‍वासामुळेच मुरुड, नांदगाव व चेहेर शाखां मिळून 40 कोटी ठेवींचा टप्पा पार केला असून चेहेर शाखेने 1 कोटीचे इष्टांक पूर्ण केल्या बद्दल सभासदांचे आभार व्यक्त केले. कोव्हिडमुळे दोन वर्षे ग्राहक मेळावा आयोजित करता आला नव्हता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मेघराज जाधव यांनी तर आभारप्रदर्शन बाळकृष्ण कासार यांनी केले.

Exit mobile version