। नागोठणे । वार्ताहर ।
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक यंत्रणेकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे वेगवेगळ्या कल्पना आखत आहेत. त्यासाठी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील महिला, युवा, अपंग व आदर्श मतदान केंद्रांची निवड करुन तेथील मतदान केंद्रांवर फक्त युवक व फक्त महिला सखी कर्मचारी नियुक्त करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील नागोठण्यातील एक मतदान केंद्रावर युवा कर्मचारी व नागोठणे विभागातील दोन व कोलाड येथील एक मतदान केंद्रावर महिला सखी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
लोकसभेच्या पेण या विधानसभा मतदार संघातील नागोठणे जिल्हा परिषद मतदारसंघातर्गत मतदान केंद्र क्र. 282 पिगोंडे(आंबेघर), कोलाड येथील मतदान केंद्र क्र. 358 येथील मतदान केंद्रांवर पोलिस शिपाई, मतदान कर्मचारी ते अधिकारी हे केवळ महिला सखी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. तर नागोठण्यातील राजिप मराठी शाळा(कन्या शाळा) नवीन इमारतीमधील दक्षिणेकडील खोली क्र. 4 मध्ये युवा संचलित मतदान केंद्र क्र. 280 या ठिकाणी मतदानाच्या दिवशी केवळ युवा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत जास्तीत जास्त महिला, युवा व इतर सर्व मतदारांनी मतदानाचा आपला पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन पेणचे प्रांताधिकारी तथा जिल्ह्याचे सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रवीण पवार, रोहाचे तहसीलदार व तालुका निवडणूक अधिकारी डॉ. किशोर देशमुख व तालुका पुरवठा अधिकारी व तालुका सहाय्यक निवडणूक अधिकारी उज्ज्वला अंधेरे-भोईर यांनी केले आहे.