गुटख्याचा साठा घेऊन जाणार्‍या तरुणाला अटक

। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने ईको कार मधुन लपवून नेला जाणारा सुमारे 3 लाख 34 हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला व वि-1 तंबाखुचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा घेऊन जाणाऱया तौशिक मोहम्मद अयुब सिद्धीकी (31) याला ताब्यात घेऊन त्याची ईको कार देखील जप्त केली आहे.
सदर गुटख्याचा साठा त्याने कुठून आणला व तो कुठे घेऊन जात होता, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. पनवेल मधील पारगाव येथे एक व्यक्ती ईको कारमधून गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या आदींच्या पथकाने पनवेल मधील पारगाव येथे सापळा लावला होता. गव्हाण फाटा येथून आलेली संशयास्पद ईको कार गुन्हे शाखेच्या पथकाने अडवून त्याची तपासणी केली. सदर कारमध्ये सुमारे 3 लाख 34 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व तंबाखुचा साठा आढळुन आला. त्यामुळे गुन्हे शाखेने तौशिफ मोहम्मद आयुब सिद्धीकी याच्या कारमध्ये सापडलेला गुटखा व पान मसाल्याचा साठा जप्त करुन त्याच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version