। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये साठवणूक करून ठेवलेल्या गुटख्याच्या दोन गोणी असलेला सुमारे दीड ते दोन लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने जप्त केला आहे. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले आहेत. याबाबतचा गुन्हा कामोठे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.
गोपनिय बातमीदारामार्फत कामोठे वसाहतीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करण्यात आला असून त्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त, सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठेतील नौपाडा गावातील त्या बंद खोलीच्या भागामध्ये कक्ष 3 गुन्हे शाखेकडून सापळा रचण्यात आला होता व छापा टाकला.
यावेळी दोन गोणी भरून असलेला सुमारे दीड ते दोन लाच रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला. यावेळी चार आरोपीपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहे. या प्रकरणामध्ये कक्ष 3, गुन्हे शाखेचे वपोनिरी शत्रुघ्न माळी, सपोनि ईशान खरोटे, पोहवा मोरे, पोहवा कोळी, पोहवा वाघमोडे, पोना पाटील, पोना जेजूरकर, पोना पाटील, पोना फुलकर, पोना जोशी, पोना मोरे, पोना सोनवलकर यांनी सहभाग घेवून महत्वपूर्ण कामगिरी बजावली.