कर्जाचे हप्ते भरण्यासाठी लावला होता तगादा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात करंजा येथे बँकेच्या मनमानी व हुकूमशाही कारभारामुळे एका निष्पाप तरुणाने आत्महत्या करुन आपले जीवन संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. प्रथमेश देसाई असे या तरुणाचे नाव आहे. पोटचा गोळा अचानक गेल्याने आईवडील व त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना आणि एमएएस (मास) फायनान्स कंपनी संचालकांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी प्रथमेश देसाई याच्या आईवडिलांसह जनतेतून केली जाऊ लागली आहे.
याबाबत हकीकत अशी की, दि. 09 नोव्हेंबर 2022 रोजी वृषाली विलास देसाई यांच्या नावे मोटारसायकल 15,000/- (पंधरा हजार रूपये मात्र) डाऊन पेमेंट देऊन कर्जाने घेण्यात आली. दरमहा हप्ता 3,788/- होता. आतापर्यंत 16 हप्ते नियमितपणे भरले होते. गाडीची किंमत 1,08,000/ – (अक्षरी रुपये एक लाख आठ हजार मात्र) होती. आतापर्यंत रुपये 75,608/- (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार सहाशे आठ मात्र) भरले होते. अंदाजे 32,086/- (अक्षरी रुपये बत्तीस हजार श्याऐंशी मात्र) बाकी होती. केवळ बत्तीस हजार रुपयांच्या वसुलीसाठी कंपनीचे एजेंट अशोक सावंत, दिलीप सिंग यांचे धमकीचे फोन सदर आमचा मुलगा प्रथमेश विलास देसाई याला यायचे. आमची मुलगा जेएनपीटी पोर्ट (एन.एस.आय. सी.टी.) येथे कामाला होता. त्याला मासिक पगार महिन्याला रुपये 13,000/- (अक्षरी रुपये तेरा हजार मात्र) त्यातून तोच दरमहा कंपनीस कर्ज हप्ता जी.पे. (गुगल पे) करायचा नयमितपणे हप्ते भरायचा तरी मात्र एमएएस (मास) फायनान्स बँकेने अन्यायकारक पद्धतीने माझा मुलगा प्रथमेश देसाई याचा छळ केला व त्याला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्याने आत्महत्याचे शेवटचे पाऊल उचलले याला सर्वस्वीपणे एमएएस (मास)फायनान्स बँकेचे संचालक व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांना अटक करून, गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रथमेश देसाई याची आई वृषाली देसाई, वडील विलास देसाई यांनी केली आहे.
सदर गाडी प्रथमेशच्या आईच्या नावे असून, आई उरण मोरा रोड वरील नगराज इंटरनॅशनल स्कूल, बोरी रोड येथे शिपाई म्हणून काम करीत आहे. तर वडील विलास देसाई हे वृत्तपत्र विकायचे काम करतात. मोठे भाऊ हर्षल विलास देसाई, वय-28 वर्षे, गणपती बनविण्याच्या करखान्यात कामगार आहेत. एका सर्वसामान्य कष्टकरी परिवाराच्या मुलास रात्री-बेरात्री सारख्या धमक्यांमुळे बेजार करण्यात आले आहे. राहत्या घराच्या बाजूजवळील विहिरीवर सर्वांसमक्ष त्या गाडीबाबत अपमानित केले. त्यावेळी गावातील महिला व नागरिक उपस्थित होते. त्याची गाडी दारातून धमकीने व जबरदस्तीने बुधवार दि. 04 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता खेचून नेली. तेव्हा त्याचा मनावर आघात झाला व त्यांनी 5.30 ते 6.00 वा. दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना आहे.ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा प्रथमेशजवळ कोणीही नातेवाईक नव्हते. तो एकटाच घरी होता. मात्र फायनान्स बँकेचे मनमानी कारभार व त्रास देण्यासंदर्भातील सर्व व्हॅट्सअॅप मेसेज आपल्याकडे उपलब्ध आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेऊन तात्काळ गुन्हा नोंदवावी, अशी मागणी आई वडिलांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात एमएएस फायनान्स सर्विसच्या 9024006071, 8149945114 या नंबर वर कर्मचार्यांना फोन लावले असता ते फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसर्या कोण्या व्यक्तीने याच नंबरवर फोन केल्यास त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. प्रथमेशच्या मोठ्या भावाने या नंबरवर फोन केले असता आम्ही फायनान्सचे काम करत नाही, तुला काय करायचे कर, आम्ही कोणाला घाबरत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. तसेच प्रथमेशच्या मोठ्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकीसुद्धा फोनवरून दिली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. जर या घटनेत फायनान्स बँक किंवा फायनान्सचे कर्मचारी दोषी असतील, तर निश्चित त्यांच्यावर कायदेशीर करण्यात येईल, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली.