पोलीस ठाण्यात विष पिऊन गेलेल्या तरुणाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।

विषारी द्रव्य पिऊन कळंबोली पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहन सिताराम पाटील (25) असे या तरुणाचे नाव असून एका महिलेने त्याच्या विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केल्याने त्याने सदर महिलेच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे विषारी द्रव्य पिऊन पोलीस ठाण्यात बेशुध्द होऊन पडलेल्या या तरुणाला पोलिसांनी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता.

मृत रोहन पाटील तळोजा एमआयडीसीतील चिंध्रण गावात राहण्यास होता. तसेच त्याचे कळंबोलीत राहणार्‍या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रोहन पाटील याने ब्लॅकमेल करुन आपले दागिने घेतल्याचा आरोप करत सदर महिलेने रोहन पाटील विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गत आठवड्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी पोलिसांनी रोहन पाटील आणि त्याच्या विरोधात तक्रार करणारी महिला या दोघांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मात्र, पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीच रोहन पाटील याने विषारी औषध प्राशन करुन तो कळंबोली पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर रोहन पाटील याने पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलीस अंमलदारांकडे पोलीस अधिकार्याबाबत विचारपूस केल्यानंतर त्याने उपस्थित पोलीस अंमलदाराच्या टेबलावर चिठ्ठी फेवून त्याच ठिकाणी तो बेशुध्द पडला. सदर चिठ्ठीमध्ये रोहन पाटील याने त्याच्या विरोधात तक्रार करणार्या महिलेच्या प्रेमापोटी आत्महत्या करत असल्याचे लिहिल्याचे आढळून आले.

Exit mobile version