महाड – दिडशे फूट खोल दरीत पडलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यु झाला. महाड आणि माणगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या घरोशीवाडी येथे ही घटना घडली. आदित्य संतोष कदम (वय २६, रा. चांभार खिंड ता. महाड ) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
आदित्य आपल्या तीन मित्रांसह घरोशी वाडी येथे वर्षासहलीसाठी गेला होता. उंच डोगरावर चढून हे तिघे फोटो काढत असताना आदित्यचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला. महाड तालुका पोलीस पोलिसाना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सह्याद्री मित्र आणि साळुंखे रेस्क्यु टीमचे बचाव पथक तेथे दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गंभीर जखमी अवस्थेत आदित्यला बाहेर काढले.
महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस उपनिरीक्षक श्री. अगाव, ए.एस.आय. श्री. घोगरे, पेालीस शिपाई श्री. भुसे, श्री. शेख यांची देखील या पथकाला मोलाची मदत झाली. महाड येथे प्राथमिक उपचार करून त्याला पुणे येथे हलविण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यु झाला. घटनास्थळ माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने माणगांव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.