अंधार, पाऊस आणि मृत्यूशी झुंज; तरुणाचा मृतदेह आठ तासांच्या शोधमोहीमेनंतर बाहेर
। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीजवळील केपी वॉटरफॉल परिसरात रिल्स चित्रीकरणासाठी गेलेल्या ठाण्यातील अभिषेक कुशवाह (23) याचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.2) घडली. मुसळधार पाऊस, दाट अंधार आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्थानिक युवक, हेल्प फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि खोपोली पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून सोमवारी पहाटे तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक कुशवाह हा मित्रांसह केपी वॉटरफॉल परिसरात फिरण्यासाठी आला होता. सायंकाळच्या सुमारास धबधब्याजवळ तोल जाऊन तो खोल दरीत कोसळला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी रात्री उशिरा ठाकूरवाडीतील ग्रामस्थांकडे धाव घेत मदतीची याचना केली. घटनेची माहिती मिळताच ठाकूरवाडीतील युवकांनी कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळ गाठले. त्याचबरोबर हेल्प फाउंडेशनचे सुनील पुरी यांनी गुरुनाथ साठेलकर यांच्याशी संपर्क साधत खोपोली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सुनील पुरी, गुरुनाथ साठेलकर, सौरभ घरत, योगेश औटी, निखिल ढोले यांच्यासह स्वयंसेवक आणि स्थानिक युवकांनी रात्रीच शोधमोहीम सुरू केली. मात्र, मुसळधार पाऊस, निसरडी वाट, दाट धुके आणि खोल दऱ्यांमुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. हातातील टॉर्चच्या प्रकाशात शोध सुरू असतानाही अभिषेकचा ठावठिकाणा लागला नाही. मध्यरात्रीनंतरही शोध सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, अमोल कदम आणि मेहबूब जमादार यांनी दत्त मंदिर परिसरात समन्वयाची जबाबदारी सांभाळत शोधपथकाला आवश्यक माहिती पुरवली.
शिवदुर्ग मित्र मंडळाचे सुनील गायकवाड तसेच डेला ॲडव्हेंचर्सचे गणेश गीध यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. मात्र, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमुळे पहाटे उजेडात पुन्हा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहाटे पुन्हा सुरू झालेल्या शोधमोहीमे दरम्यान दरीच्या तळाशी गवत दबलेले आढळून आले. त्या दिशेने तपासणी केली असता अभिषेक कुशवाह हा निश्चल अवस्थेत आढळला. सौरभ घरत यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बकेट स्ट्रेचर, दोरखंड आणि इतर साहित्याच्या साहाय्याने अत्यंत कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून वर आणण्यात आला. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे, पोलीस कर्मचारी राहुल चौगुले आणि बचाव पथकाच्या उपस्थितीत मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
अभिषेक कुशवाह, साहील हरिजन (17), देवा गायधनकर (22) आणि त्यांचा आणखी एक मित्र हे चौघेही कोणालाही न सांगता केपी वॉटरफॉल परिसरात गेले होते. त्यांच्याकडे टॉर्च, दोरखंड, प्राथमिक उपचार साहित्य किंवा ट्रेकिंगसाठी आवश्यक साधने नव्हती. त्यामुळे अपघातानंतर तत्काळ मदत मिळण्यात विलंब झाल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या निमित्ताने पावसाळ्यात धबधबे, दऱ्या आणि धरण परिसरात सेल्फी किंवा रिल्सच्या मोहापायी जीव धोक्यात घालू नये, तसेच आवश्यक सुरक्षा साहित्याशिवाय अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासन आणि बचाव पथकाकडून करण्यात आले आहे.
