वारंवार वीजपुरवठा खंडित; जागेअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव शहर आणि तालुक्यात वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, विद्युत दाबाचा सतत कमी-जास्त होणारा खेळ आणि त्यामुळे विस्कळीत होणारा पाणीपुरवठा यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. घरगुती ग्राहक, व्यापारी, उद्योग, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालयांनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारणे ही काळाची गरज बनली असून, हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, माणगावसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून कंपनी प्रकल्प उभारण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली सुमारे पाच एकर जागा अद्याप उपलब्ध न झाल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प रखडला आहे. शासन अथवा नगरपंचायतीमार्फत जमीन उपलब्ध होताच उपकेंद्र उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले की, वीज वितरण कंपनीला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. नगरपंचायत हद्दीतील उपलब्ध जागांचे सर्वेक्षण करून योग्य जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.
सध्या माणगाव शहराचा वीजपुरवठा कांदळगाव आणि गोरेगाव येथील वीज केंद्रांवर अवलंबून आहे. वाढता वीजभार, तांत्रिक बिघाड किंवा देखभाल दुरुस्तीमुळे संपूर्ण शहराला वारंवार अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत दाबातील चढ-उतारामुळे घरगुती आणि व्यावसायिक विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाणीपुरवठाही विस्कळीत होतो. अनेक भागांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. व्यापाऱ्यांचे व्यवहार ठप्प होतात, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो, तर रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांवरही त्याचा परिणाम होत आहे.
माणगाव हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख आणि मध्यवर्ती शहर असून दरवर्षी येथे नवीन वसाहती, व्यापारी संकुले आणि औद्योगिक विकास वेगाने होत आहे. त्यामुळे भविष्यातील वाढती वीज मागणी लक्षात घेता स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
तटकरेंकडून दखल
या प्रश्नाची खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दखल घेतली असून प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे आणि शासनस्तरावरील मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. माणगावच्या विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो तातडीने मार्गी लावावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे.







