दुचाकी अपघातात तरुण ठार; दोन जखमी

। महाड । प्रतिनिधी ।
महाड औद्योगिक क्षेत्रांमधील एका कंपनीतून आपले काम संपवून एकाच दुचाकीवरून घरी परत जात असणार्‍या तीन तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकर दिली, या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून दोघेजण जखमी झाले आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील कोप्रान कंपनी समोर 1 जूनला रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला.

अपघातात मृत पावलेल्या तरूणाचे नाव विनय विनोद रहाटे (वय 19 मूळ राहणार दहागाव )असे आहे. विनय रहाटे हा आपल्या विनय वाडकर (वय 19 राहणार आदर्श नगर, महाड) व प्रितेश कळंबे (वय 18 राहणार काळीज- महाड) या दोन मित्रांसह निकोलस या कंपनीमध्ये आपले काम संपवून रात्री क्टिवा दुचाकीवरून महाडला येत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास महाड औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर कोप्रान कंपनी जवळ आले असता भरधाव येणार्‍या एका अज्ञात वाहनाने या क्टिवा दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे ही दुचाकी सुमारे 15 ते 20 फूट रस्त्यावर फरपटत गेली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने विनय रहाटे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे सहप्रवासी विनय वाडकर व प्रितेश कळंबे हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत .अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यानंतर वाहन चालक वाहनासह फरारी झाला आहे .त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Exit mobile version