केज तालुक्यातील असंख्य युवकांचा पक्षप्रवेश
| केज | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत केज तालुक्यातील असंख्य युवकांनी पक्षात प्रवेश केला. शुक्रवार, (दि. 8) मार्च रोजी केज येथे शासकीय विश्रामगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे युसुफवडगावचे राचलिंग पाटील, प्रसाद थळकरी, प्रभुलिंग निगडीकर, केजचे कृष्णा रोडे, शरद कांबळे यांच्यासह अनेक युवक कार्यकर्त्यांनी मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शक म्हणून कॉम्रेड काशिनाथ कापसे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. जगन्नाथ थळकरी होते.
आजचं राजकारण हे समाजाच्या हिताचं राहिलेलं नाही, हे सर्व पुढार्यांच्या हिताचं चाललेलं आहे, हे काळाचे पाऊल ओळखून वैचारिक तरुणांनी ज्यांना शेतकरी कामगाराचा सर्वसामान्य माणसाचं भलं व्हावं असं वाटतं अशा युवकांनी डाव्या विचारात येऊन आता काम करण्याची गरज आहे, प्रामाणिक कार्यकर्तेच वैचारिक चळवळीत काम करू शकतात, असे मत कॉ.कापसे यांनी व्यक्त केले.
तालुक्यासह जिल्हाभरात आपण गावागावात शेतकरी कामगार पक्षाचे ग्रामदूत म्हणून दोन कार्यकर्त्यांची निवड करणार आहोत, ते गावात राजकारण न करता फक्त शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर काम करतील, यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील, ग्रामदूतच्या माध्यमातून काम करणार असल्याचे मत भाई मोहन गुंड यांनी व्यक्त करत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी गोविंद आगळे यांनी क्रांतिकारी गीत गात चळवळी वाढल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
शेकाप हा चळवळीचा पक्ष आहे, या पक्षाची गरज सर्वसामान्यांना आहे. केज तालुक्यातील तरुणांनी पक्षात येऊन काम करावे, असे आवाहन अॅड. जगन्नाथ थळकरी यांनी व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या राणीताई श्रीरसागर, भाई अशोक रोडे, मंगेश देशमुख यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
आयुष्यभर याच पक्षात राहू आता सर्वसामान्यांच्या हिताचा फक्त शेतकरी कामगार पक्ष म्हणजे लाल बावटा दिसून येत आहे. या पक्षाचा प्रामाणिक इतिहास आहे, तो आमच्या वाचण्यात आला आणि शेतकर्याची बाजू प्रामाणिकपणे लावून धरणारा पक्ष म्हणून आम्ही या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश करत आहोत. आयुष्यभर या पक्षात राहून आम्ही काम करणार असल्याचे मत रासलिंग पाटील, कृष्णा रोडे यांनी व्यक्त केले.