पेणच्या तरुणाईचे झिंग झिंग झिंगाट…खोकल्याच्या औषधांसाठी तोबा गर्दी

। पेण । संतोष पाटील ।
पेणमधील युवा पिढी वाईट मार्गावर वळू लागल्याचे विदारक दृष्य सामोरे येऊ लागले असून,कोणी दारुचा पेग, सिगारेटचा झुरका, तर कोणी तंबाखूचा बार भरुन नशा करतात. नशा करण्याचे हे फंडे जुने झाल्याचे सांगून तरुणाई आता भलत्याच नादाला लागली आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणारी औषधे तरुणाईला नशाखोरीसाठी खुणावू लागली आहेत. पेण शहरात रात्री उशिरापर्यंत तरुणाईची मेडिकलबाहेरची वाढणारी गर्दी धोक्याची घंटा देणारी ठरत आहे.

वातावरणातील बदलांमुळे सर्दी व खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. परिणामी, कफ सिरपच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ही औषधे विनाप्रिस्क्रिपशन मिळत असल्याने नशा करणार्‍यांचे चांगलेच फावत आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा रुग्णांना शांत झोपेसाठी घेतल्या जाणार्‍या गोळयांचा वापरही अलीकडे नशा म्हणून केला जात आहे. डेक्सद्रोंप्रॉपॉज्यकीफेन, पेन्टाजोसीन, ब्रुफेनॉफिन, मॉरफीन सल्फेट, हायड्रोक्लोराईड, ब्युट्रॉफॅनोल या वेदनाशामक औषधांचा तसेच स्मरणशक्ती वाढववणार्‍या गोळयांचा नशेसाठी वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

कोडीन आणते नशा
औषधांमध्ये कोडीन हा घटक असलेले कोणतेही कफ सिरप नशा आणते. यातील काही औषधांसोबत आता झोपेच्या, वेदनाशामक, स्मरणशक्ती गोळयांची छुप्या पद्धतीने चढ्या दराने विक्री केली जाते. तरुणांबरोबरच शाळकरी मुलांमध्ये हे प्रामण वाढले असून, त्याला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुजोरा दिला आहे. खोकल्यासाठी वापरले जाणारे कोंरेक्स नशेसाठी मोठया प्रमाणात वापरले जाते. त्याचा अतिरिक्त डोस वेगळयाच धुंदीत घेऊन जातो. मेंदूविकार किंवा मानसोपचारासाठी वापरल्या जाणार्‍या काही गोळ्याही मात्रेपेक्षा जास्त घेतल्या तर नशेची तलफ भागवता येत असल्याचेही समोर आले आहे.

रात्रीस खेळ चाले
रायगड जिल्हयात अनेक तालुक्याच्या ठिकाणी मेडिकलची 24 तास सुरु राहणारी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये रात्री 11 नंतर मोठया प्रमाणावर तरुणांचीच गर्दी पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी रोजच्या रोज इतक्या तरुणांना नेमकी कोणती औषधे लागतात याची माहिती विक्री करणारे आणि खरेदी करणार्‍यांनाच ज्ञात असते; पण चिठ्ठीशिवायच मोठया प्रमाणावर येथे तरुणांना औषध विक्री केली जाते. काही दुकानांत औषधे विक्रेती मुले चार पैसे मिळविण्यासाठी चिठ्ठीशिवाय औषधे नशेखोरांना विकतात.

अन्न व औषध प्रशासन डोळ मिटुन
जिल्हयात अस्तित्वात असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागात माणसांची मुळातच वानवा आहे. कोविड काळात वरिष्ठ अधिकारी रुजू झाले असले तरीही कर्मचार्‍यांची सुटी, शासकीय दौर्‍यांमध्ये कर्मचार्‍यांची नेमणूक आणि कार्यालयीन कामांमुळे त्यांना कार्यालय सोडणे शक्य होत नाही, तर निरीक्षक दर्जाचा अधिकारी मेडिकल दुकानादारांच्या खासगी कामांमध्ये व्यस्त असल्याचे मेडिकल व्यावसायिक सांगतात. त्यांना कधीही कोणत्याही कामासाठी फोन केला जर मी सध्या प्रवासात आहे, परत कॉल करतो असा मेसेज येतो. त्यानंतर ते कधीच फोन करत नाहीत आणि चुकून फोन उचललाच तर मी एसटीने भागातला दौरा करतोय हे ठरलेले उत्तर दिले जाते. त्यामुळे नियम धाब्यावर बसविणार्‍या दुकानदारांना हे पद्धतशीरपणे पाठीशी घालत असल्याचेही व्यावसायिक सांगतात.

खिशाला परवडणारी जीवघेणी नशा
परप्रांतीय मजूर नशेसाठी सर्रास ब्रेडला आयोडिन किंवा झंडू बाम लावून सँडविच स्वरुपात खातात. खोकल्यासाठीचे कोरेक्स अर्धा बाटली प्राशन केल्याने किक बसत असल्याचे तरुण सांगतात.तसेच स्पिरीट देखील पाण्यात टाकून पिण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुर व आदिवासी बांधव यांच्यामध्ये पहायला मिळते.

आज तरुणाईमध्ये अनेक औषध नशा करण्यासाठी वापरतात. हे खूप दुर्दैवी आहे. हे कुठेतरी थांबायला पाहिजे, याकडे आरोग्य यंत्रणेने योग्य लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एक तरुण पिढी बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. या औषधांचा अतिरिक्त वापर मानवी शरीरास खूप घातक आहे.

डॉ. संदीप चौधरी


Exit mobile version