। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल, उरण परिसर स्थानिक भूमीपुत्र, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांची भूमी आहे. तरुणांनी नोकरीशिवाय अधिक संख्येने व्यवसायाकडे वळावे तसेच विशेषतः मराठी तरुणांनी उद्योग धंद्यांकडे आपला कल वाढवावा. तरुणांनी आपला व्यवसाय प्रगत तंत्रज्ञानाने करावा, त्यामुळे या परिसराची प्रगती होईल. स्थानिकांचे प्राबल्य अबाधित राहिले पाहिजे, त्याचप्रमाणे व्यवसायात 50 टक्के रोजगार महिलांना द्यावा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. ते जासई येथे संतोष घरत, गुरू घरत यांच्या एस.आर. ब्रदर्स ऑटोमोबाईल पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी आ. बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, जेएनपीटी विश्वस्त दिनेश पाटील, उरण पंचायत समिती सभापती समिधा म्हात्रे, उपसभापती वैशाली पाटील, धनाजी ठाकूर, प्रा. एल.बी. पाटील, संतोष घरत, माजी सभापती नरेश घरत, धर्मा पाटील, मनोहर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आ. पाटील पुढे म्हणाले, की पनवेल-उरणचे शहरीकरण झपाट्याने होत असून, शहराची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल होत आहे. याठिकाणी लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील उभे राहणार आहे. त्या अनुषंगाने केवळ कंत्राटी तसेच डंपरचा व्यवसाय न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन इतर व्यवसायदेखील करावे. या परिसरात स्थानिकांसह बाहेरच्या परिसरातूनही मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी येत आहे. लवकरच याठिकाणी मेट्रोदेखील सुरू होणार असून, लोकवस्तीदेखील दिवसेंदिवस वाढणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपला प्रभाव ठेवायचा असेल, तर स्थानिकांनी नोकरीशिवाय व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे.
- स्थानिकांनी नोकरीशिवाय व्यवसायाला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच तो व्यवसाय प्रामाणिकपणे केले पाहिजे. असे केल्यास या भागाची निश्चितपणे प्रगती होईल आणि स्थानिकांचे असलेले प्राबल्य अबाधित राहील. – आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप