। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चाणजे, नवघर, जासई व कोप्रोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यावेळी उरण तालुक्यातील तरुण सक्रिय झाले असून, आता आम्हाला आमच्या हक्काचा तसेच भूमिपुत्रांना न्याय देणारा प्रीतम म्हात्रे यांच्या रूपाने आमदार हवा असल्याच्या प्रतिक्रिया तरुणांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटातील अनेक गावांतून तरुण आणि युवा मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागला आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यातील चित्र बदलले आहे. समाजात सर्वसामान्य नागरिकांना सर्वतोपरी सदैव सहकार्य करण्यासाठी तत्पर असलेले प्रीतम म्हात्रे यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याने भारावून शेकडो तरुण गावोगावातील प्रचारात सक्रिय झाले आहेत. आजपर्यंत त्यांनी वैयक्तिक 50 हजारपेक्षा जास्त कुटुंबांना रोजगार दिला आहे. या उलट विरोधकांनी आतापर्यंत नुसती आश्वासने दिली आहेत. यासाठी संपूर्ण युवाशक्ती प्रीतम म्हात्रे यांच्या पाठीमागे असून त्यांचे काम तळागाळात पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे.
आम आदमी पार्टीचा पाठिंबा
शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांना आम आदमी पार्टीने बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संघटन मंत्री यांनी दिले आहे. यावेळी शेकाप कार्यकर्त्यांसह आपच्या कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, प्रीतम म्हात्रे यांना विविध पक्ष, संघटना आणि संस्थाचा पाठिंबा मिळत असून उरण मतदार संघातील त्यांची ताकद वाढली आहे.