| पनवेल | वार्ताहर |
लग्नाचे स्वप्नं दाखवत घाटकोपरच्या निखिल दळवीने आत्महत्या करीत असल्याचे भावनिक नाट्य वठवत तरुणीला साडेचार लाखाला गंडा घातला आहे.
कामोठे येथील भगत हेरिटेजमध्ये राहणार्या एका तरुणीची निखिल दीपक दळवी, रा. चिरागनगर घाटकोपर, मुंबई याची शादी डॉट कॉम आणि संगम मॅट्रिमोनी वेबसाईटवर ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. निखिलने तिला भावनिक जाळ्यात अडकवून एके दिवशी आर्थिक अडचणीत असल्याने आत्महत्या करीत असल्याची बतावणी केली. त्यानंतर तिच्याकडून दोन वेळा एकूण साडेचार लाखाची रक्कम उकळली. त्याचे बोगस बैंक स्टेटमेंट, पोचपावती तिला दिली. याशिवाय आरोपी निखिल दळवीने गुगलमध्ये कामाला असल्याचा चकवा देत तिला फसविल्याने तरुणीने कामोठे पोलिस ठाण्यात निखिल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश पगारे यांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमल बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे यांच्याकडे प्राथमिक तपास सोपविला आहे.