। रसायनी । प्रतिनिधी ।
राज्यात अल्पवयीन तसेच महिला तरुणी यांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्यांना गर्भवती ठेवण्याची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशातच आता रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यात राहणारी पीडित तरुणी हिला पनवेल तालुक्यातील तक्का येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने पीडित तरुणीसोबत दीड वर्षापूर्वी ओळख वाढवली. त्यानंतर तिच्यावर प्रेम असल्याचे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तरुणाने वारंवार शारीरिक संबंधाची मागणी केली. पिडितेने लग्न करण्याची अट घातली. प्रियकराने पीडित तरुणी हिच्या सोबत प्रेमाचा बनाव करीत तिच्याशी वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. तक्का येथील तरुणाने त्याचे वय 19 वर्षे असतांना. देखील ते वाढवुन 22 वर्षे सांगून पीडितेसोबत कायदेशीर विवाह न करता विवाह संस्कार श्री समर्थ विवाह मंगल केंद्र कर्जत या ठिकाणी करून घेतल्याचा आरोप पीडितेन केला. त्यानंतर प्रियकराने तिला नांदण्यास न नेता तिला माहेरीच ठेवून तिच्याशी तिथे संमतीशिवाय वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पीडित तरुणी आणि प्रियकर यांच्यातील झालेल्या शारीरिक संबंधामुळे पिडित तरुणी ही गर्भवती राहिली. पीडितेने आरोपीला आपण गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा तिने प्रियकराला त्याच्या घरी घेऊन जाण्यास सांगितले, परंतु तो पीडितेला उडवा उडवीची उत्तरे देत वेळ मारून नेत होता. दरम्यान, प्रियकराने पीडित तरुणीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन मनाविरुद्ध गर्भपात घडवून आणला. याबाबत रसायनी पोलीस ठाणे येथे पीडितेने तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे ह्या पुढील तपास करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
