महिला आरोपीला अटक; दीड कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत
| वसई | प्रतिनिधी |
वसईत दीड कोटी रुपयांच्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात झालेल्या मोठ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी एका अविवाहित तरुणीने आपल्या सख्ख्या बहिणीच्या सासरच्या घरी चोरी केली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली. यावेळी चोरीला गेलेले दीड कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. ज्योती भानुशाली (27) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
वसईतील उदय भानुशाली (66) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली. आरोपी ज्योती भानुशाली ही उदय भानुशाली यांच्या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे. ज्योतीने चोरी करण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली. तिने पुरुषाचा वेष धारण केला आणि घरात शिरली. घरात आल्यावर तिने उदय भानुशाली यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर तिने घरातील कपाटात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एका पुरुषाच्या वेशात असलेल्या व्यक्तीवर संशय आला. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा ही व्यक्ती पुरुष नसून एक तरुणी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी ज्योती भानुशालीला गुजरातमध्ये जाऊन अवघ्या 12 तासांत अटक केली. पोलिसांच्या चौकशीत ज्योतीने कबूल केले की तिला शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
