दोन दिवसांची पोलीस कोठडी ,उर्वरित आरोपींना देखील अटक करण्याची मागणी
| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील चणेरा विभागात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या गौण खनिज चोरीबाबत कृषीवल मधून सातत्याने आवाज उठविण्यात आला होता.तळवडे येथील मनिषा बांदल या महिलेच्या शेतातील माती एका वीटभट्टी व्यावसायिकाने विना परवानगी उत्खनन करून नेली होती.याबाबत संबंधित महिलेने मागील दोन महिने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा चालवला होता. या माती चोरी करणार्यांच्या विरोधात भादवि कलम 379,427 व 34 अन्वये गुन्हा दाखल होऊन देखील आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.अखेर 13 जुलै रोजी या प्रकरणातील मुख्य आरोपी मुजमिल गिते याला रोहा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात मुजमिल गिते
,मुदस्सर गिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून माती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबी एमएच 15 सीयू 5613 वरील चालक तसेच डंपर क्रमांक एमएच 04 एफजे 3267 व एमएच 04 – 7167 वरील चालक या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज चोरी होत असताना देखील महसूल विभागातील काही अधिकार्यांची या व्यावसायिकांशी असलेल्या तडजोडीमुळे कोणताही गुन्हा दाखल होत नव्हता.पण स्वतःच्या शेतातील माती चोरून नेणार्याला जाब विचारायला गेल्यावर संबंधित महिलेला दुरुत्तरे करण्यात आली.यामुळे संतापलेल्या महिलेने तहसीलदार, पोलीस निरीक्षक ,प्रांताधिकारी रोहा तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकार्यांकडे दाद मागितली होती. मुख्य आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याने गुन्हा नोंद होऊन देखील आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.पण राज्यात सत्तांतर होताच वेगाने चक्रे फिरली आणि मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली.या प्रकरणातील अन्य आरोपींना देखील अटक व्हावी आणि माती चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले जेसीबी,डंपर देखील जप्त करण्यात यावे अशी मागणी पुढे येत आहे.