युवा पैलवान जय दीपक कुंभार याचे निधन
। माण । प्रतिनिधी ।
माण तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळावा, अशी अतिशय दु:खद घटना घडली आहे. मलवडीचा युवा पैलवान जय दीपक कुंभार (14) याचे आकस्मिक निधन झाले आहे. येथील हॉटेल व्यावसायिक दीपक कुंभार यांनी आपल्या मुलाला म्हणजेच जयला पैलवान बनवायचे या ध्येयाने जय याला लहानपणापासून घडवले. जयला झिरपवाडी व तिथून पुढे पुणे येथील जाणता राजा कुस्ती संकुल येथे सराव व प्रशिक्षणासाठी ठेवले होते. शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्षे त्याने 14 वर्षे वयोगटात राज्यपातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. तर, 2024 ला 17 वर्षे वयोगटात 62 किलो वजनीगटात विभाग पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला. नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. महाराष्ट्र केसरीसह ऑलिम्पिक पदक मिळवायचे हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जयसह दिपक कुंभार यांचे स्वप्न भंगले. सकाळच्या सुमारास सराव केल्यानंतर आकस्मिक जय याचे निधन झाले.